‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सरकारने जाहीर केली. या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीं बरोबरच विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. असं असलं तरी सर्वांचे लक्ष असेल तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ बहीणीकडे. या कार्यक्रमाला हे दोघे एका मंचावर दिसणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरकारने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना सुरू केली आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची गोड भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमात महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येणार आहे.
राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात 1 कोटी 56 लाख 61 हजार 209 महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 9 लाख 74 हजार 66 महिलांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज यासाठी स्वीकारण्यात आले होते.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील आमदार खासदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे, रविंद्र धंगेकर, संग्राम जगताप, अमोल कोल्हे या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या योजनेवर विरोधकांनी चांगलीच टिकेची झोड उठवली होती. त्यात खासदार सुप्रिया सुळेही आघाडीवर होत्या. अशा वेळी सरकारच्या याकार्यक्रमाला त्या हजेरी लावणार का? या योजनेच्या निमित्ताने तरी पवार भाऊ बहीण मंचावर एकत्र दिसणार का? याचीच चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world