राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यांना घेताना बेरचेचा विचार केलाच पाहीजे. पण त्यांच्यामुळे पक्षाला कमी पणा येता कामानये याचा विचार नक्कीच केला जाईल. शिवाय जे ज्यांनी पक्षात राहुन चुकीचं काम केलं त्यांची हकालपट्टी केल्या शिवाय राहाणार नाही असा सज्जड दमच अजित पवारांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसाचे पक्षाचे अधिवेशन शिर्डीत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. पक्षातून हाकालपट्टी करणार या वक्तव्याची चर्चा या अधिवेशनात चांगलीच रंगली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अनेक जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे. ते सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटत आहेत. माझी ही भेट घेत आहेत. पण सरसकट सर्वांना पक्षात घेतलं जाणार नाही. बेरजेचा विचार करताना पक्षालाही कमी पणा येणार नाही याचा विचार करावा लागणार आहे असंही ते म्हणाले. काही जण तर काही उपयोगाचे नाहीत. त्यांना घेवून काय उपयोग असंही अजित पवार म्हणाले. ज्यांची जनमानसात प्रतिमा मलिन आहे त्यांना पक्षात कधीही घेणार नाही असं अजित पवारांनी बजावलं आहे. शिवाय संघटनेत काम करत असताना कुणीही गैरवर्तन करू नये. पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कुणीही करू नये. चुकीच्या गोष्टी ही कुणी करू नये असंही त्यांनी ठणकावलं आहे.
यावेळी त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जर कुणी चुकीचं काम केलं. ते सिद्ध झालं. तर त्याची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल. मागे पुढे पाहीले जाणार नाही. त्यामुळे पक्ष शिस्त पाळा. कुणाचीही दादागिरी चालणार नाही. त्याची दादागिरी त्याला लखलाभ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. पण त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. तर छगन भुजबळांनी बंडखोरीचे सुर आळवले आहेत. अशा वेळी हा इशारा पवारांनी नक्की कोणासाठी दिला होता याचीही चर्चा होत आहे.
दरम्यान जरी आपले आमदार प्रत्येक मतदार संघात नसले तरी आपली संघटना आपल्याला प्रत्येक मतदार संघात असली पाहीजे. त्यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न करा. दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर सकाळी सात वाजता मंत्र्यांची, विधानसभा परिषद आमदारांची बैठक घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितले. शिवाय महिन्यातून एकदा जिल्हाध्यक्षांच्या बैठकीचे आयोजन करा. याला सर्व जिल्हाध्यक्षांना बोलवा. त्यामुळे ते त्यांच्या जिल्ह्यात काय करत आहेत याचा आढावा घेता येईल असंही अजित पवारां सांगितलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश ही यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने 25 घरांवर लक्ष दिले पाहीजे. महापालिकेत चार प्रभाग असतील त्यानुसार कामाला लागा असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढणार असल्याचे संकेतही अजित पवारांनी यावेळी दिले आहेत. शिवाय पक्ष शिस्तीबाबत त्यांनी सुचक इशारा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world