अहमदनगर जिल्हा म्हटलं तर विखे पाटील घराण्याचं नाव पहिलं घेतलं जातं. हा जिल्हा म्हणजे विखे पाटलांचा गड मानला जातो. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला तडा गेला. विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत प्रस्थापित विखे पाटीलांना धक्का दिला. महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याला मोठा पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता विधानसभेसाठी विखे पाटील आपला गड शाबूत ठेवण्यासाठी तयारीला लागले आहेत. अशातच त्यांना आणखीन एक धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीलाच पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांना उमेदवारी देवू नये अशी मागणी पुढे आली आहे. तर लोकसभा पराभवानंतरही विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'विखे पाटील यांना उमेदवारी देवू नका'
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते निवडून येणार नाहीत, असे जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचा दावा भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. जनतेच्या लोक आग्रहास्तव शिर्डी मतदार संघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेत पिपाडा यांनी भूमिका जाहीर केली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघातील भाजप मधील अंतर्गत कलह त्या निमित्ताने समोर आला आहे. पिपाडा हे विखे पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाता. सध्या हे दोघेही भाजपमध्ये आहेत.
एकीकडे विरोध दुसरीकडे तयारी
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीला एकीकडे विरोध होत असताना दुसरीकडे मात्र सुजय विखे पाटील विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. सुजय विखे पाटील हे लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संगमनेर हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा गड मानला जातो. विखे या मतदार संघातून मैदानात उतरल्यास आगामी विधानसभेत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.
विखे पाटील थोरातांना भिडणार?
अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात विखे आणि थोरात या दोन बड्या नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. काँग्रेसमध्ये एकत्र असतानाही एकाच जिल्ह्यातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता. यथावकाश विखेंनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर तर दोघांमधील कलगीतुरा अधिकच उठावदार पद्धतीने रंगू लागला. संगमनेर विधानसभा मतदारसंघावर बाळासाहेब थोरात यांचं एकहाती वर्चस्व आहे. 1985 पासून 2019 पर्यंत असे सलग आठ वेळा ते संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल मंत्रालयाची धुराही सांभाळली होती. त्यामुळे थोरातांच्या साम्राज्याला खालसा करणं तितकसं सोपं नसेल. तरीही सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे.
ट्रेंडिंग बातमी - एक वाद अन् आरुषीचा शेवट; कराडमध्ये आणखी एका 'दाऊद'ने प्रेयसीला संपवलं!
राहुरीचीही केली जात आहे चाचपणी
संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात आमदार असल्यामुळे थोरात विरूद्ध विखे लढत होणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे. संगमनेरमध्ये विखे पाटील यांचा टिकाव लागेली की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे राहुरी मतदार संघाचीही चाचपणी केली जात आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत. ते महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही होते. राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे असा सामना होऊ शकतो. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सुतोवाच केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world