मत्सविकास मंत्री नितेश राणे कट्टर हिंदूत्ववादी असल्याची स्वत:ची प्रतिमा निर्माण करत आहेत. त्यातून ते वादग्रस्त विधाने करत आहेत. मिनी पाकिस्तान, पाकिस्तानला परत जा, हिंदू राष्ट्र, मुस्लिमांची मते याबाबत ते एकामागून एक वादग्रस्त विधाने करत आहेत. नितेश राणे मंत्री झाल्यानंतर ते अशी विधाने करणे टाळतील असं वाटत होतं, तसं झालं नाही. त्यांच्या विधानांचा काँग्रेस राष्ट्रवादीने निषेध केलाच आहे. शिवाय त्याला विरोधही दर्शवला आहे. आता महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्यानेही नितेश राणे यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. शिवाय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानाच आवाहन केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे हे मंत्री आहेत. त्यामुळे ते दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करणार नाहीत असं विरोधक म्हणत होते. पण तसं झालं नाही. आता त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते उभे ठाकले आहेत. इरफान सय्यद हे शिवसेना शिंदे गटाते उपनेते आहेत. त्यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नितेश राणे यांना आवरावे. अन्यथा पुढील काळात जशास तसे उत्तर देऊ असा इशाराच त्यांनी दिला आहे.
महायुतीला राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं. या यशात सर्व जाती धर्माच्या मतदारांचे योगदान आहे. त्यात ठरावीक मतदारांचा हिस्सा नाही. सर्व जाती धर्माने मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे महायुतीत सत्तेत आहे हे नितेश राणे विसरले आहेत. त्यात ते मंत्री ही झाले आहेत. अशा वेळी मंत्रिपदाचं महत्व त्यांना समजत नसेल तर त्यांनी पायउतार व्हावे असं ही सय्यद म्हणाले. शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्यानेच राणेंना हे आव्हान दिल्या मुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
या आधीही भाजपचे मुंबईतले नेते हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांना जाहीर पणे विरोध केला होता. शिवाय त्यांना नको त्या शब्दात सुनावले होते. राणे यांनी आपल्या बोलण्याला आवर घालावा असंही त्यांनी बजावलं होतं. शिवाय पक्षाच्या वरिष्ठांकडेही त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. पण त्यानंतर नितेश राणे यांना आधी उमेदवारी देण्यात आली.सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्री ही करण्यात आले. त्यामुळे राणे यांच्यावर पक्षातील वरिष्ठांची मर्जी आहे हे स्पष्ठ आहे. त्यात आता शिंदे गटाच्या नेत्याने आक्षेप नोंदवल्यामुळे फडणवीस त्याबाबत काय भूमीका घेतात हे पहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world