
राजकारणात काहीही होऊ शकतं असं नेहमी म्हंटलं जातं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये हे वारंवार सिद्ध झालंय. 2019 नंतर राज्यानं अनेक बड्या राजकीय उलथापालथी पाहिल्या आहेत. आता या मालिकेतील नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा (Hindi language controversy) सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. या मुद्यावर सर्वांनी पक्षीय मतभेद विसरुन एकत्र यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी केलं आहे. मनसेकडून 5 जुलै रोजी या विषयावर मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. राज ठाकरेंच्या या मोर्च्यात उद्धव ठाकरे यांचा पक्षही सहभागी होणार आहे. त्यामुळे या मोर्च्याची उत्सुकता चांगलीच वाढलीय. त्याचवेळी आता मनसेकडून चक्क कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसलाही साद घालण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचा कट्टर विरोधक अशी राज ठाकरेंच्या मनसेची प्रतिमा आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज यांनी या आघाडीवर जोरदार हल्ला चढवला होता. मनसे आणि महाविकास आघाडीचे अनेक विषयांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. पण, मराठीच्या मुद्यावर ज्या पक्षांवर सातत्यानं टीका केली त्यांनाच साथ देण्याचं आवाहन मनसेनं केलं आहे.
( नक्की वाचा : Mumbai BJP : कोण होणार मुंबई भाजपा अध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस, निर्णय कधी? )
यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मनसेकडून विचारणा करण्यात आली. ठाकरेंच्या पक्षानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना फोन केला आणि आंदोलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे.
( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )
काँग्रेस काय निर्णय घेणार?
मनसेकडून निमंत्रण आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांसोबत चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना जर मराठी सगळे एकत्र येणार असतील तर आम्ही पण सोबत आहोत असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे 5 जुलै रोजी सर्व विरोधक एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world