
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डान्सबार प्रकरणी कदम हे अडचणीत आले होते. त्यांचा राजीनामा त्याच वेळी होणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज देवून त्यावेळी कदम यांना वाचवल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली होती. पण आता कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलीसांचा विरोध असतानाही बंदुकीचा परवाना कदम यांनी दिला. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर राजीनामा दिला नाही तर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
सचिन घायवळ याला योगेश कदम यांच्या शिफारशीवरून बंदुकीचा परवाना मिळाला आहे असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. सचिन घायवळ हा निलेश घायवळ या कुख्यात गुंडाचा भाऊ आहे. पोलीसांनी याच सचिन घायवळला त्याची पार्श्वभूमी पाहात बंदुकीचा परवाना नाकारला होता. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे होते. मात्र या अहवालाकडे दुर्लक्ष करत योगेश कदम यांनी या सचिन घायवळला परवाना देवू केला असा आरोप आहे. हा सर्वस्वी निर्णय कदम यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यालाच ते जबाबदार आहेत. अशा वेळी त्यांनी ताडीने राजीनामा द्यावा अशी मागणीच अनिल परब यांनी केली आहे.
सचिन घायवळ याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्यात खून खंडणी या सारख्या गुन्ह्यांचा समावेश होता. पुराव्या अभावी त्याची निर्दोष सुटकाही झाली. पण त्याची पार्श्वभूमी पाहाता त्याला परवाना देवू नये असे पुणे पोलीसांचे मत होते. हे प्रकरण अपीलात गेले होते. ते थेट गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या पुढे गेले. पण त्यांनी पुणे पोलीसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत थेट त्यांना परवान्याची का गरज आहे, त्यांच्या जीवाला कसा धोका आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कॅशची देवाण घेवाण करावी लागते ही कारणे देत त्यांना परवाना देवू केला असं परब यांनी सांगितलं.
अनिल परब आणि रामदास कदम यांच्या सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. आधी दसरा मेळाव्यात कदम यांनी बाळासाहेबांच्या डेडबॉडीचा विषयाला हात घातला. लगेचच परब यांनी त्याची सव्याज परतफेड करत रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झाला होता असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. त्यातून कदम सावरत नाही तोच आता योगेश कदम यांनी दिलेल्या परवान्याचा आयता कोलीत परब यांच्या हातात मिळाला आहे. त्यामुळे कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात परब यांनी शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे. या आधी ही डान्सबारवरून कदम अडचणीत आले होते. अशा स्थितीत फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कदम यांचा राजीनामा घेणार का याकडे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world