Devendra Fadnavis Oath Ceremony Update : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपानं सर्वाधिक 132 जागा मिळवल्या. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते. भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमतानं फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. आता गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी कार्यक्रम भव्य करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
कधी आणि कोण घेणार शपथविधी?
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही पाठिंबा दिला आहे. दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात सर्वात प्रथम फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलंय.
काय आहे वेळ?
गुरुवारी संध्याकाळी (5 डिसेंबर 2024) रोजी साडेपाच वाजता शपथविधी कार्यक्रम सुरु होईल.
( नक्की वाचा : यशवंतराव ते देवाभाऊ... महाराष्ट्राचे आजवर किती मुख्यमंत्री झाले? कुणाचा कालावधी होता सर्वात जास्त? )
कोण राहणार उपस्थित?
विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत यश मिळवलं आहे. हे यश साजरं करण्यासाठी हा कार्यक्रम भव्य करण्याची तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, शिवराज सिंह चव्हाण, नितीन गडकरी यांच्यासह नऊ ते दहा केंद्रीय मंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्याचबरोबर भाजपा आणि एनडीएशासीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील शपथविधीला येणार आहेत.
सर्वधर्मीय साधूसंत देखील शपथविधी कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पाच ते दहा हजार 'लाडक्या बहिणी' येतील, त्यांची वेगळी बसण्याची सोय केली आहे. मुंबईतील हाऊसिंग सोसायटींचे चेरमन-सेक्रेटरी असे पाच हजार जण कार्यक्रमाल उपस्थित राहणार आहेत. वारकरी. डब्बेवाले यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय. त्याचबरोबर राज्यभरातून महायतीचे हजारो कार्यकर्त आणि नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण
महाराष्ट्रातील बसस्टॉप, थिएटर, ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाच्या एलईडी स्क्रीन लावलेलेल्या आहेत त्या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, मुकेश अंबानी यांसह अनेक बड्या नावांना प्रशासकीय निमंत्रण जाणार आहे. तब्बल 60 ते 70 हजारांच्या गर्दीत हा शपथविधी कार्यक्रम होणार आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांची मोठी फौज
शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान परिसरात पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फौज तैनात असणार आहे. याठिकाणी एक सह पोलीस आयुक्त, तीन अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, 16 सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि शेकडो पोलीस अधिकारी हजर असतील. कार्यक्रमाच्य सुरक्षेसाठी दक्षिण मुंबईतील वाहतूक तसंच पार्किंग व्यस्थेमध्येही बदल करण्यात आले आहेत.
‘एक है तो सेफ है'चे कक्ष
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘एक है तो सेफ है'चा नारा दिला होता. आता शपथविधी सोहळ्यातही ‘एक है तो सेफ है'चा नारा दिसणार असून, त्यासाठी खास कक्ष निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी ‘एक है तो सेफ है', अशा आशयाचे मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत. तसेच शेतकरी, संविधान असे आणखी दोन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
कुठं पाहणार कार्यक्रम?
आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रिका आवश्यक आहे. निमंत्रण पत्रिकेशिवाय घटनास्थळी प्रवेश मिळणार नाही. तुमच्याकडं निमंत्रण पत्रिका नसेल तरी निराश होण्याची गरज नाही.
'NDTV मराठी' वृत्तवाहिनी, 'NDTV मराठी' च्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला संपूर्ण शपथविधी कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल. त्याचबरोबर कार्यक्रमाचे सर्व अपडेट्स आणि विश्लेषण तुम्हाला 'NDTV मराठी' च्या वेबसाईटवर वाचता येतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world