
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी थेट भूमीका मांडली आहे. शिवाय आपण या पुढच्याकाळात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांना मोदी आणि शाह यांचे विचार पटत असतील त्यांनी आमच्या सोबत यावे असंही सांगत त्यांनी एकत्रीकरणाचा मुद्दाच निकाली काढला आहे. तटकरे हे पंढरपूरला दर्शनासाठी आले होते त्यावेळी ते पत्रकारांबरोबर बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, याबाबत पांडुरंगाकडे मागणे मागण्याचा विषय येत नाही. अजित पवार , प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह चर्चा करून सामुदायिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आम्ही एनडीएमध्ये गेलो असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. शिवाय येत्या काळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू असं ही त्यांनी ठाम पणे सांगितलं. त्यामुळे या विचारांचे जे असतील तेच आपल्या सोबत असतील, हे सांगायला ते विसरले नाही.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता ही त्यांनी फेटाळून लावली. शिवाय ही चर्चा निरर्थक असल्याचे ही सुनील तटकरे म्हणाले. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटला का ? या प्रश्नावर उत्तर देताना तटकरे यांनी आपण सात्विक भावनेने विठ्ठल दर्शनासाठी आलो आहोत. मी कूपमंडन प्रवृत्तीचा नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या दारी रायगड पालकमंत्रिपदाचा आपल्या मनात प्रश्न नाही.असे सांगत अद्यापही रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत तटकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा होती. शरद पवारांना आजही आपले दैवत मानतो असे वक्तव्य तर अजित पवारांनीच केले होते. त्यानंतर या चर्चेला आणखी बळ मिळालं. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या चर्चेतील हवाच काढली. शिवाय आपण मोदी शाह यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं स्पष्ट करताना, शरद पवारांचे नेतृत्व एक प्रकारे फेटाळून लावले आहे. शिवाय जर मोदी शाह यांचे विचार पटत असतील तेच आमच्या सोबत असतील अशी अट टाकत त्यांनी शरद पवार गटाचीही कोंडी केल्याची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world