![Political news:'उबाठा, मविआच्या सरपंचांना एक रुपयाचाही निधी देणार नाही' भाजपचा मंत्री बोलला वाद ही पेटला Political news:'उबाठा, मविआच्या सरपंचांना एक रुपयाचाही निधी देणार नाही' भाजपचा मंत्री बोलला वाद ही पेटला](https://c.ndtvimg.com/2025-01/8vr7kij8_nitesh-rane-latest-image_650x400_29_January_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
निधी कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी निधी वाटपावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षातल्या सरपंचाना एक रुपयाचाही निधी देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्या तुमची ही घमेंड उतरवू असं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी केलं आहे. मात्र सर्वांना निधी दिला जाईल असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुडाळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'या वर्षीचा निधी संपला की, 31 मार्चनंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार आहे. जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही', असा थेट दमच त्यांनी दिला आहे. ते ऐवढ्यावर थांबले नाहीत, गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा, असं ही ते म्हणाले. विरोधकांना निधी देण्याचे काम सरकार पक्ष करत असतो. असा स्थितीत राणे यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटले आहे. राणे यांची गुर्मी मस्ती त्यांनी बोलून दाखवली असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. विकास निधी सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे. आमच्यामध्ये सुद्धा धमक आहे, तुमची घमेंड उतरवायची असा इशाराही राऊत यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक यांनीही यावर टीका केली आहे. तुमचे वडील वीस वर्षापूर्वी पालकमंत्री होती. त्यांनी देखील विरोधकांना असेच संपवण्याचे काम केलं. अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक फोडले. निधी दिला नाही. दीपक केसरकर यांना डीपीडीसी मिटिंगच्या बाहेर घालवण्यात आले. ही मस्ती जास्त काळ टीकत नाही. जिल्ह्यातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असं नाईक म्हणाले.
या सर्वावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंनी पाडलेला पायंडा आम्ही सुरू ठेवणार नाही. आम्ही विरोधकांनासुद्धा निधी देऊ. लोकशाहीत विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घ्यावे लागते असं बानवकुळे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राणेंची मात्र कोंडी झाली आहे. त्यामुळे ते त्यांचे वक्तव्य मागे घेणार की बावनकुळेंच्या वक्तव्यालाच खो देणार हे लवकरच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world