जाहिरात
Story ProgressBack

राणा - कडू भिडले, जोरदार हल्लाबोल, नेमका वाद काय?

Read Time: 3 min
राणा - कडू भिडले, जोरदार हल्लाबोल, नेमका वाद काय?
अमरावती:

लोकसभा निवडणूक जशी जशी रंगात येत आहे तशा तशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अमरावतीत तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील सख्य सर्वांनाच माहित आहे. निवडणुकीच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा उफाळून आलं आहे. बच्चू कडू यांच्यावर रवी राणा यांनी जोरदार हल्लाबोल करत गंभिर  आरोप केला आहे. तर त्यांच्या त्या गंभिर आरोपांना बच्चू कडू यांनीही तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र दोघांच्या आरोप प्रत्योरोपांनी मात्र अमरावतीकरांचं चांगल मनोरंजन होत आहे. 

रवी राणांनी काय केला आरोप? 
बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला खुल आव्हान दिलं आहे. त्यानंतर राणा आक्रमक झाले आहेत.  आमचा भाऊ हा तोडी बाज आहे. पूर्ण महाराष्ट्रात  सेटलमेंट करण्यात माहीर आहे. राज्यात एखादा सेटलमेंट कमिशनरचे पद असेल तर त्याला द्यावं. बच्चू कडू ही काँग्रेसची बी टीम आहे अशी जोरदार टीका आमदार रवी राणा यांनी केलीय. राणा यांच्या या आरोपामुळे कडू आणि राणा यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. 

 
बच्चू कडूंचा राणांवर हल्लाबोल  
राणांच्या या आरोपांना बच्चू कडूंनीही त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. रवी राणा यांनी यापूर्वी माफी मागितली. मोठा भाऊ म्हटलं, एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात कुठेच मिळणार नाही.  सेटलमेंट तर रवी राणा यांनीच केली. भाजपसोबत केली. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केली. आपल्या विधानसभेसाठी केली. तू काय काय काळे धंदे केले हे काढायला लावू नकोस असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.  सुप्रीम कोर्टात जरी निकाल त्यांच्या बाजूने लागला असता तरी जनतेचे उत्तर मात्र वेगळे असेल असेही ते म्हणाले.  नवनीत राणा भावनिक होऊन जे अश्रू गाळले त्यावर बोलताना निवडणुकीत वारंवार रडणं चांगलं नाही, सहानुभुती घेण्यासाठी कितीदा रडणार असा प्रति प्रश्न बच्चू कडू यांनी केला. रवी राणा यांनी बच्चू कडू हे काँग्रेसचे बी टीम असल्याचां आरोप केला यावर बोलताना बच्चू कडू यांनी, पत्नी भाजपमध्ये तुम्ही कुठल्या पक्षात, पोरगं कोणत्या पक्षात जाईल असा प्रतिप्रश्न केला.  

राणा- कडू वाद काय? 
अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास बच्चू कडू यांची प्रहार संघटना आग्रही होती. नवनीत राणांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता. राणा ऐवजी दुसरा कोणीही उमेदवार द्या अशी कडू यांची महायुतीत मागणी होती. मात्र राणांनाच उमेदवारी मिळाल्यानं ते नाराज झाले. शेवटी त्यांनी वेगळी चुल मांडली. तर महायुतीत युतीचा धर्म पाळावा, लोकसभेत आम्हाला मदत करा विधानसभेला तुम्हाला मदत करू अशी भूमिका राणा यांची होती. जर मदत केली नाहीत तर याद राखा असा धमकीवजा इशारा राणा यांनी कडूंना दिला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नव्हता. शेवटी हे दोन्ही नेते आता वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे एकमेकांवर तोंडसुख घेण्याची संधी ते सोडत नाहीत. 

अमरावतीत कोणा कोणात लढत? 
अमरावती लोकसभा मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे.  या मतदार संघात बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. बडनेरातून रवी राणा आमदार आहेत. तर अमरावती, तिवसा, दर्यापूर या तिन मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर मेळघात आणि अचलपूरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहारचे आमदार आहेत. इथं तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपच्या नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बूब हे मैदानात आहेत. यामध्ये आता बाजी कोण मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination