
शिवसेना ठाकरे गटाला सध्या गळती लागली आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर ते अगदी कोकणापर्यंत अनेक नेते ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्य बाण हातात घेत आहेत. काही नेते नाराज आहेत. त्यांची नाराजीही समोर आली आहे. त्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. कोकणातील आणखी एक नेता, माजी आमदार वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसात नाईकही ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैभव नाईक हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. सर्व गोष्टी या माध्यमांना सांगायच्या नसतात. काही गोष्टी या गुप्त ठेवायच्या असतात, असं सांगताना वैभव नाईक हे आमच्या कसे संपर्कात आहेत हे सांगायला गोगावले विसरले नाहीत. त्यामुळे ही गुगली होती की खरोखर वैभव नाईक हे शिंदेंच्या संपर्कात आहेत याबाबत चर्चा मात्र सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. साळवी यांच्यानंतर वैभव नाईक यांच्या मागेही चौकशीचा ससेमिर लागला आहे. त्यामुळे तेही आता ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी झाली म्हणजे आरोपी झाला असं नाही, असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. चौकशीला ते सामोरे जातील, योग्य वेळी योग्य माहिती दिली जाईल असं ही ते म्हणाले.
दरम्यान गोगावले यांचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी खोडून काढला आहे. वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वत:ला बाजारात विकायला ठेवलेलं नाही. भरत गोगावले सारखे दलाली वृत्तीचे राजकारणी ज्या पद्धतीने वैभव नाईक यांची प्रतिमा मलिन करतात, त्याचा आपण धिक्कार करतो, असं राऊत म्हणाले. खरेदी विक्रीच्या बाजाराला ते बळी पडणार नाही असं ही राऊत म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - महिलांसाठी खुशखबर! 'छावा' चित्रपट मोफत पाहता येणार, कधी अन् कुठे? जाणून घ्या
दुसऱ्या पक्षातल्या लोकांना पैशाच्या जोरावर आपल्याकडे ओढण्याची निच वृत्ती शिंदे गटाची आहे असा आरोप ही त्यांनी केला. त्यांच्या या डावाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते बळी पडणार नाहीत असंही ते म्हणाले. शिंदे गटाची जी वृत्ती आहे ती नामर्द पणाची आहे. ते जे काही डाव सध्या खेळत आहेत त्यात त्यांना यश येणार नाही असं ही ते म्हणाले. वैभव नाईक हे मातोश्रीवर आले होते. त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. अशा पद्धतीने दबाव वाढवणाऱ्या या नामर्दांची किव वाटते असं ही यावेळी राऊत म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world