लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकांचे वेळ लागले आहेत. पुढच्या तीन-चार महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होवू शकते. त्या आधी राज्यातल्या महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. 27 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या आधी हा विस्तार होईल. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. त्यामुळे हा विस्तार लवकरच होईल अशी शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत महायुतीने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर महायुतीचे नेते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीत जे झाले ते विधानसभेत टाळण्याच्या दृष्टीने आता पावलं टाकली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. नव्या चेहऱ्यांना संधी आणि ताकद या माध्यमातून देण्याचा प्लॅन महायुतीच्या नेत्यांचा आहे. शिवाय सरकार स्थापन झाल्यापासून अजित पवारांच्या गटाला संधी दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार हा रखडलेलाच आहे. विधानसभा निवडणुकी आधी तो केल्यात त्याचा फायदा होईल असे महायुतीच्या नेत्यांना वाटते. 27 जून पासून पावसाळी अधिवेश सुरू होत आहे. त्या आधी हा विस्तार अपेक्षित आहे. विस्तारानंतर जे नाराज आहेत त्यांची नाराजी दुर होवू शकते. शिवाय लोकसभा निवडणुकीनंतर काही आमदार हे कुंपणावर आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलण्या आधी हा विस्तार गरजेचा वाटत आहे.
ट्रेंडिंग बातमी - सत्तार की सावे? कोण होणार संभाजीनगरचा पालकमंत्री; संजय शिरसाटही वेटिंगवर
या आधी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. हे सर्व मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहेत. त्यातील संदिपान भूमरे हे लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद हे रिक्त झाले आहे. उरलेली मंत्रीपदं ही राज्यमंत्रीपदे असणार आहेत. एकूण 12 मंत्रीपदे अजून रिक्त आहेत. त्यामुळे तीन पक्षांच्या वाट्याला यातील किती येतात हेही पाहावे लागणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिंदे आणि पवार गटाला तीन तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. उरलेली मंत्रीपदे ही भाजपच्या पारड्यात पडतील.
या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळावी यासाठी सर्वाधिक इच्छुक हे शिवसेना शिंदे गटात आहे. पहिल्या विस्तारापासून अगदी शपथ घेण्याच्या तयारीत असलेले भरत गोगावले, संजय शिरसाट यांची प्रतिक्षा या निमित्ताने संपणार असल्याचीही चर्चा आहे. शिवाय शिंदे गटाकडून योगेश कदम, संजय गायकवाड, प्रताप सरनाईक, सुहास कांदे, बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांनी मंत्रीपद मिळावे अशी भावना अनेक वेळा व्यक्त केली आहे. त्यामुळे जाग कमी आणि इच्छुक जास्त अशा वेळी शिंदेंना मंत्रीपद देते वेळी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - मनोज जरांगेंच्या निधनाची अफवाच, खोटी बातमी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
भाजपकडूनही इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यात संजय कुटे, आशिष शेलार, रवी राणा, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोणाला संधी द्यायची मंत्रीमंडळातील कोणाला वगळायचे याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला खुप जपून पावलं टाकावी लागणार आहेत. यात कोणी नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. भाजप शिवसेने प्रमाणेत अजित पवारांच्या गटातही अनेकांना मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world