![महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवली योजना महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवली योजना](https://c.ndtvimg.com/2024-07/0okj0ii_mahayutimeeting_640x480_06_July_24.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईमध्ये मंगळवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीकडून आमदार अनिकेत तटकरे, संजय खोडके भाजपाकडून आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश टिळेकर, आमदार अजित गोपछडे आणि शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आशिष कुलकर्णी उपस्थितीत होते.
हे ही वाचा: 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना
या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा संपूर्ण राज्यभर संयुक्त दौरा आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रितपणे संपूर्ण राज्याचा दौरा करतील असे या बैठकीत ठरवण्यात आले. समन्वय समितीचे प्रमुख भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बैठकीनंतर याबाबची माहिती दिली.
हे ही वाचा : महायुतीची डोकेदुखी वाढणार! विधानसभा निवडणुकीत या 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
संयुक्त दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी हा दौरा कुठून सुरू होईल, त्याची सांगता कुठे होईल किती दिवसांचा असेल याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. हा दौरा कधी सुरू होणार याचा निर्णय येत्या 2-3 दिवसांत होणार आहे. 15 ऑगस्टनंतर या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना तसेच महायुतीमध्ये बिघाडी झाली असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी या संयुक्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही पक्ष एकत्र असून महायुती अबेद्य असल्याचा संदेश देण्यासाठी हा संयुक्त दौरा आयोजित केला जाणार आहे.
हे ही वाचा: काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची धाकधूक वाढणार? तिकीट वाटपाचा निकष ठरला
या दौऱ्यादरम्यान राज्य सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांचाही प्रचार केला जाणार आहे. याशिवाय मतदारांच्या मनात काय आहे याचा कानोसा घेण्याचाही या दौऱ्यात प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मुक्तागिरी निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती. जवळपास 3 तास ही बैठक चालल्याचे कळते आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world