महायुतीत अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार यावर दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात आता सध्याची स्थिती पाहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने किती जागा लढायचे हे निश्चित केले आहे. तशी मानसिकता त्यांनी बनवली आहे. या आधी राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जागा लढण्यासाठी आग्रही होती. मात्र आता त्यांनी काही ठिकाणी तडजोड करण्याचे निश्चित केले आहे. नुकतीच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात हा निर्णय झाला आहे. शिवाय महामंडळांबाबत काय करायचे याचीही रणनिती ठरवण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार 2019 साली निवडून आले होते. या जागा त्यांना मिळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यात आणखी 15 ते 16 जागा मिळाव्यात असा अजित पवारांचा प्रयत्न आहे. अशा 70 जागा लढण्याचे अजित पवारांनी निश्चित केल्याचे समजते. भाजप आणि शिवसेनेचा सध्याचा जागांचा आग्रह पाहात 80 ते 90 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अजित पवार गटाने आपली मागणी कमी करत आता 70 जागा तरी मिळाव्यात अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवारांना साथ दिली होती. शिवाय काही अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अजित पवारांबरोबर सध्या असलेल्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचेही पक्षाने निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही हे स्पष्ट आहे. अजित पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना कामाला लागण्याच्या सुचना ही देण्यात आल्यात.
दरम्यान या बैठकीत महामंडळांबाबतही चर्चा करण्यात आली. शिंदे गटाकडून त्यांच्या नेत्यांना महामंडळं देण्यात आली आहेत. तशी घोषणाही करण्यात आली. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तशी कोणतीही घोषणा केली नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांवर काहींची वर्णी लावली जाईल असे ठरले आहे. मंत्रिमंडळात सरसकट सर्वांना संधी मिळणार नाही. त्यामुळे सत्ता आल्यानंतर काहींना महामंडळ देण्यात येईल अशी रणनिती अजित पवार गटाने आखली आहे. त्यामुळे निवडणुकी आधी राष्ट्रवादीकडून कोणालाही महामंडळावर संधी मिळणार नाही हे स्पष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world