जाहिरात
This Article is From Mar 16, 2024

कोणत्या नेत्याचे विधान तुम्हाला सर्वात धक्कादायक वाटते ?

कोणत्या नेत्याचे विधान तुम्हाला सर्वात धक्कादायक वाटते ?
प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, नितेश राणे, भास्कर जाधव यांची  नावे आघाडीवर आहे. विरोधकांनी केलेल्या टिकेला, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात हे सर्वच नेते आघाडीवर असतात. आक्रमक भाषेत उत्तर देण्याच्या नादात वादग्रस्त वक्तव्य करत धुराळा उडवून देण्याचा प्रकार या सर्वांच्या बाबतीत अनेकदा घडलाय. या चार नेत्यांची कोणती वक्तव्य आजवर वादग्रस्त ठरली आहेत हे पाहूया...

आमदार जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आव्हाड यांच्याकडे मंत्रिपद होते. सध्या ते शरद पवार गटामध्ये आहेत. 

'श्रीराम मांसाहारी'

शिर्डीमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य करत खळबळ उडवली होती. या वक्तव्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. त्यांच्या घरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाकडूनही आंदोलन देखील करण्यात आलं होतं. 

वारकरी संप्रदायाची माफी 

'संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता,'असं वक्तव्य आव्हाड यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. त्यानंतर वारकरी संप्रदायानं त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असा दावा आव्हाड यांनी त्यानंतर केला. 

इंदिरा गांधींवर टीका

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर बोलतानाही आव्हाड यांनी त्यांचा सहकारी काँग्रेस पक्षाला दुखावले होते. 'इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटला',असं आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सहकारी पक्ष आमने-सामने आले होते. या व्यक्तव्यानंतरही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला, अशी सारवासारव आव्हाड यांनी केली होती.  

कोरोना, कब्रस्थान आणि अल्ला

ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आव्हाड आमदार आहेत. या मतदासंघातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'अल्ला को 2011 मे पता था की 2020 मे कोरोना आनेवाला है इसलिये 2019 मे मुंब्रा मे नया कब्रस्तान बना,' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असे सांगून आव्हाड यांनी या प्रकरणावर पडदा पाडला. 
 

सावरकर आणि गोळवलकर...

अजित पवार यांनी जानेवारी 2023 मध्ये विधानसभेत संभाजी राजेंवर वक्तव्य केले होते.त्यानंतर त्या वक्तव्याला प्रतिसाद देत आमदार आव्हाड यांनी एका पुस्तकाची प्रत सादर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्याबद्दल काय लिहून ठेवले ते वाचा, असं ट्विट आव्हाडांनी केलं.'ह्या शूर वीरास बदनाम करण्याचं काम एका वर्गाकडून अनेक वेळा झालं आहे. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीनं संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते.याच्यावर कोणी बोलेल का? असं आव्हान आव्हाड यांनी दिलं होत.

औरंगजेबावर वक्तव्य आणि माफी

फेब्रुवारी 2023 रोजी एका सभेत  औरंगजेबाचा उल्लेख 'मुघलांची अवलाद' असा  केल्यानं मुस्लिम समाज नाराज झाला होता.त्यानंतर मुस्लिम समाजाने मुंब्रा मतदार संघातून आम्ही आव्हाडांना मत देणार नाही अशी भूमिका घेतल्याने आव्हाडांनी त्यांची माफी मागितली होती.

सनातन आणि हिंदू धर्म वेगळा

आव्हाड यांनी मार्च 2023 मध्ये  सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड आहे,असे वक्तव्य त्यांनी केले होते. “सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत.हे आमचं दुर्दैव आहे.सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही. ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात. पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली. येथील 95 ते 97 टक्के समाजाला शिक्षणापासून,अधिकारापासून वंचित ठेवणारा सनातन धर्म आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा निषेध नोंदविण्यात आला होता. 


छत्रपती शिवाजी महाराज

जितेंद्र आव्हाड यांनी एका सभेत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.मोघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असल्याचं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितले होते. त्यावर 'शिवाजी महाराज ग*** खेळले का ?' असा प्रश्न विचारत औरंगजेब, अफजल खान आणि शाहिस्तेखान समोर होते म्हणून शिवाजी महाराज आहेत असे वक्तव्य केले होते.  


गांधी,श्रीराम आणि भुजबळ 

2024 मध्येही आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. 2024 हे वर्ष  सुरू होताच  भुजबळ सुपारी घेतलेला प*** आहे असे वक्तव्य त्यांनी केले. गांधीजींवर तीन वेळा हल्ले झाले होते. ते ओबीसी असल्याने मोठे होत असल्याचे काहींना पहावले नाही त्यांची जातिवादातूनच हत्या झाली असे वक्तव्य त्यांनी 3 जानेवारी रोजी केले. तर तीन जानेवारीलाच त्यांनी राम हा मांसाहारी होता असे वक्तव्य केल्याने एकच गोंधळ उडाला होता.


आमदार भास्कर जाधव हे सुरुवाती पासून शिवसेनेचे कार्यकर्ते  होते. त्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीमुळे राष्ट्रवादी मध्ये आले. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आले. आता  ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असेल तरी त्यांच्याबरोबरच आहेत असे त्यांनी सांगितले. 

बावनकुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडू सारखे दिसतात ....

आमदार भास्कर जाधव यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणा-या भाजपचे नेते चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यावर टीका केली. ही टीका व्यक्तीश: केली होती. त्यांच्यावर टिका करताना ते माझे चांगले मित्र आहेत. परवा मी नागपूरला असताना ते मला भेटले होते. त्यावेळी मी त्यांच्याकडे पाहिले तर मी अचानक म्हणालो बावनकुळे साहेब तुम्ही कारण चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातील आहेत. पण ते वेस्ट इंडिजच्या खेळाडू सारखे दिसतात अशी टीका त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये केली. 

मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजप कदाचित दंगल घडवेल...

मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजप कदाचित दंगल घडवेल अशा आशयाच विधान भास्कर जाधव यांनी गुहागर येथे साधारण सप्टेंबर २०२२ मध्ये केले होते. त्यांच्या या विधानाने आकच खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपचे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी गुहागर येथील पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात तक्रार नोंदिवली होती. या तक्रारीत दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हे विधान केल्याचे तक्रारीत म्हटले होते. 

सोमय्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे नाव कसे उच्चारावे याचा सराव करतात....

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दल ठाणे येथील गडकरी रंग्यातन येथे पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेत साधारण एक वर्षापुर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी ठाण्यात पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी किरीट सोमय्या सध्या दिसत नसून ते देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे नाव कसे उच्चारावे याचा सराव करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना - शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. 

पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले ? पोलीस हप्ते घेत नाहीत का 
ताळेबंदीच्या काळात दारू विक्री करणा-या शिवसेनेच्या उप तालुका प्रमुखावर पोलिसांनी कारवाई केली होती.  त्या पदाधिकाऱ्याची बाजु घेताना गुहागर येथील सभेत त्यांनी त्याची पाठराखण केली. त्यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले ? पोलीस हप्ते घेत नाहीत का असा असा उलटा प्रश्न त्यांनी पोलिसांना केला. ते  एवढ्यावर थांबले नाहीत तर  फक्त मुलींची छेडाछेड आणि चोरी या दोन गोष्टी सोडून तुम्ही काहीही करा मी तुमच्या पाठिशी आहे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी साधारण नोव्हेंबर २०२० मध्ये केले होते. 

आमदार नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते भाजप मध्ये आहेत. त्यांची अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली आहेत. नेकवेला भाषणातून त्यांनी धमकीवजा वक्तव्य केली आहेत....

आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय....
पोलिसांसमोर बोलतोय पोलीस माझे काही वाकडे करू शकणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी जानेवारी २०२४ मध्ये केले. 

पोलीस भाषण रेकॉर्ड करून काय करणार बायकोला दाखवतील....
पोलिस भाषण रेकॉर्ड करत आहेत. पण रेकॉर्ड करून ते काय करणार फारतर घरी जाऊन आपल्या बायकोला दाखवतील. असे वक्तव्य केल्याने पोलिस कर्मचा-यांच्या पत्नींनी आवाज उठवला होता.

बलात्का-यांनी कृपया समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या व त्यांच्या कुटुंबियांना संपर्क करा....
सगळ्या बलात्का-यांनी कृपया समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आणि त्यांच्या कुटुंबियांना संपर्क करावा. हिरवा कंदील मिळाला आहे. एन्जॉय असे ट्वीट त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांना त्यांचे हे ट्वीट त्वरीत डिलीट करावे लागले होते. 

XXडा प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा आहे.....
उध्दव बाळासाहेव ठाकरे हे मर्दानगीला कलंक आहेत. XXडा प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा आहे. XXला कुठला अशी टीका त्यांनी जुलै २०२३ मध्ये केली होती. त्यानंतर तृतीयपंथीयांकडून तीव्र निषेध न्यक्त करण्यात आला होतो. इतकेच नव्हे तर त्यांनी गुन्हा नोंद करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी माफी मागत आपल्या बोलण्याचा  विपर्यास केल्याचे सांगत सारवा सारव केली होती. 

सरपंच माझ्या पसंतीचा नसेल तर निधी मिळणार नाही....
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात ग्रामस्थांना संबोधित करताना नितेश राणे यांनी निवडून आलेला सरपंच, राणे यांच्या पसंतीचा नसेल तर माझ्या निधीतून आणि सरकरी निधीतून एक रुपयाही मिळणार नाही याची मी पुरेपुर काळजी घेईन असे सांगितले.  इतकेच नव्हे तर मी नारायण राणे स्कूल ऑफ थॉटमध्ये शिकलो आहे. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही असे वक्तव्य त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये केले होते. 

आदित्य ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान
राणे यांनी विधीमंडळ परिसरात आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे का? या संदर्भात डीएनए चाचणी केली पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. विधानसभेत प्रवेश करताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना म्यँव म्यँव असे चिडवले होते. अनेकवेळा आदित्य ठाकरे यांना ते डिवचतानाही दिसून येतात. 

आमदार अब्दुल सत्तार हे  महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या विभागांचे राज्यमंत्री आहेत.   महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये पशुसंवर्धन खात्याचे राज्य मंत्री पदावर ते होते. २०१९ मध्ये ते काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत आले. ते सिल्लोड विधानसभा मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत. 

शेतक-यांचे फार नुकसान झाले नाही....
वादळी पावसात झालेल्या शेतक-यांच्या नुकसाना संदर्भात त्यांनी वक्तव्य केले होते. मी माझ्या मतदारसंघात फिरलो आहे. शेतक-यांचे फार नुकसान झाले नाही. मोठ नुकसान नाही . परंतु जे नुकसान झाल त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नाराज झाले होते. 

कार्यकर्त्याला लाथ मारली
कॉंग्रेसमध्ये असताना सत्तार आपल्या वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत आले होते. छत्रपती संभाजी नगर मध्ये एका हॉटेलमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सत्तार आणि एका कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे सत्तार यांनी या कार्यकर्त्याला लाथ मारली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हनुमानाच नाव घेत केली होती शिवीगाळ....
आघाडी सरकारमध्ये आमदार असताना अब्दुल सत्तार यांनी हिंदूंचे दैवत असलेल्या हनुमानाचे नाव घेत शिवीगाळ केली होती. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ही त्याला दमदाटी देखील केली होती. 

सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या शब्दात टिका....
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करताना सत्तार यांची जीभ घसरली होती. सुप्रिया सुळे इतकी भिकार झाली असेल तर सुप्रिया सुळे यांना देखील खोके देऊ अस सत्तार म्हणाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  सत्तार यांच्या घरावर दगडफेक देखील केली होती. 

घोटाळ्याचे आरोप...
काही दिवसांपुर्वी राज्यात टी.ई.टी घोटाळ्याचा प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे याच घोटाळ्यात सत्तार यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची देखील मागणी करण्यात आली. 

जिल्हाधिका-यांना दारू पिता का म्हणून विचारले...
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री असतांना त्यांनी चक्क जिल्हाधिका-यांनी दारू पिता का असे विचारले होते. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिका-यांना हा प्रश्न विचारला होता. 

विविध घोटाळ्याचे आरोप...
अब्दुल सत्तार यांच्यावर अनेकदा विविध घोटाळ्याचे आरोप केले होते. वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ शिवारातील बेकायदेशीर वाटप केल्याप्रकरणात देखील सत्तार यांच्या नावाची चर्चा झाली होती. गोरगरीब लोकांच्या जमिनी लाटल्याचा देखील त्यांच्यावर आरोप झाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com