महाराष्ट्रात जागा वाटपांचे ढोल आता वाजू लागलेत. एकीकडे भाजपप्रणित महायुतीच्या बैठका होतायत तर दुसरीकडे ठाकरे-शरद पवार आणि काँग्रेस महाआघाडीच्या बैठकाही पार पडतायत. महाआघाडीचं जागा वाटप तुलनेनं सोपं वाटत असलं तरीसुद्धा भाजपप्रणित महायुतीत मात्र काही नाराजीचे सूर ऐकायला मिळतायत. भाजपचे दोन नंबरचे नेते अमित शाह यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात त्यांनी संभाजीनगर आणि जळगावमध्ये दोन सभांना संबोधीत केलं. दोन्ही ठिकाणी अमित शाह हे विरोधकांच्याविरोधात जेवढे आक्रमक दिसले तेवढेच ते सहकारी पक्षांबाबतही दिसले. तसं नसतं तर संभाजीनगरच्या सभेत त्यांनी परस्पर ती जागा भाजप लढवणार असल्याचं जाहीर केलं नसतं. सध्याचा जो काही आकडा समोर येतोय तो ना एकनाथ शिंदेंसाठी सन्मानजनक आहे ना अजित पवारांसाठी. त्यामुळेच दोन्ही गटात नाराजी असल्याचं उघडपणे दिसतंय. तशी नाराजी छगन भुजबळ, रामदास कदम या नेत्यांनी बोलून दाखवलीय. त्यामुळेच मोठा प्रश्न निर्माण होतोय. भाजपा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी गिळंकृत करायला निघालीय का?
अमित शाहांच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं?
अमित शाहांनी दोन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. विशेष म्हणजे हा दौरा त्यांनी मुंबईतून सुरु करण्याऐवजी मराठवाड्यातून म्हणजे संभाजीनगरमधून सुरु केला आणि शेवट मुंबईत केला. दरम्यानच्या काळात त्यांनी खानदेश, विदर्भामध्येही निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. मुंबईत शाहांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत बैठक केली. ह्या बैठकीचा अधिकृत वृत्तांत जाहीर केला गेला नाही पण भाजपा महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 37 जागा लढवेल अशी माहिती एनडीटीव्ही मराठीच्या सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाची बोळवण आपोआपच सिंगल डिजिट जागांमध्ये होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त तीन. विशेष म्हणजे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभेच्या चार जागा लढवेल अशी घोषणा केली होती. तसं भाजपच्यासोबत आधीच ठरल्याचही त्यांनी सांगितलं होतं. पण आता अजित पवारांना फक्त तीन जागाच मिळतील असा अंदाज आहे. तर एकनाथ शिंदेंनी 18 जागांची लढण्यासाठी मागणी केलीय. त्यांना तेवढ्या जागा मिळणार नसल्याचं स्पष्ट दिसतंय.
कोणता फॉर्म्युला चर्चेत आहे?
जागा वाटपांची प्रत्यक्ष बोलणी सुरु होण्याआधी ज्यानं ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्याठिकाणी तोच पक्ष निवडणूक लढवेल अशी चर्चा सुरु होती. त्या सूत्रानुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा मिळतील अशी त्यांना आशा होती. तर अजित पवारांचा चार जागांचा दावा ठरतो. पण अमित शाहांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि जुना फॉर्म्युला मोडीत काढत ज्याची जिंकण्याची क्षमता आहे, त्यालाच तो मतदारसंघ जाईल असा नवा फॉर्म्यूला मांडला. शाहांच्या फॉर्म्यूलाचा सगळ्यात मोठा हातोडा पडतोय तो शिंदेंच्या शिवसेनेवरच. कारण गेल्या काही काळात न्यूज चॅनल्सनी तसच भाजपच्या अंतर्गत सर्वेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लोकांचा अपेक्षीत असा पाठिंबा नसल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळेच शिंदेंना 8 तरी जागा मिळतील की नाही याबाबतही साशंकताच आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सहकारी पक्षांना म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळतील असं जाहीर केलं आहे. सिंगल डिजिट जागा ही मीडियाची कल्पना असल्याचही ते म्हणालेत. त्यामुळेच शिंदे-अजित पवारांना सन्मानजनक आकड्याची आशा ठेवायला जागा आहे.
शिंदेंच्या कोणत्या जागांवर भाजपचा डोळा?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कमीत कमी पाच जागांवर भाजपचा डोळा असल्याचं दिसतं आहे. त्यात हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर आणि यवतमाळ वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, ज्या शिवसेनेचं मुंबई आणि उपनगरांमध्ये प्राबल्य आहे तिथं शिंदेंना फक्त एक जागा मिळताना दिसतेय. ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. बाकीच्या पाचही जागांवर भाजप स्वत:चा उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. इतर ज्या सात जागा शिंदेंना मिळतील अशी चर्चा आहे त्यात कल्याण, जिथून श्रीकांत शिंदे खासदार आहेत, हातकणंगले, रामटेक, बुलडाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळच्या जागांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे शिंदेंच्या नाशिक आणि मावळच्या जागांवर अजित पवार गटाचाही डोळा आहे. कारण मागच्या लोकसभेला मावळमधून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार शिवसेनेच्याच श्रीरंग बारणेंविरोधात लढला आणि पडला होता. तर नाशिकची जागा यावेळेस भुजबळांना स्वत:चा पुतण्या समीर भुजबळसाठी हवी असल्याची चर्चा आहे. शिंदेच्या कुणब्यावर फक्त भाजपच नाही अजित पवारांचा गटही डोळा ठेवून आहे.
का शिंदेंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे?
एकनाथ शिंदेंना हव्या असलेल्या जागा जर आता मिळाल्या नाहीत तर शिंदेंसोबत असलेले आमदार, खासदार फटकू शकतात. लोकसभेलाच जर शिंदे त्यांना तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत तर विधानसभेसाठी त्यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच लोकसभेला शिंदेंच्या भाजपसोबत किती बार्गेनिंग पॉवर आहे त्यावरच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. त्यातच भाजपा फक्त शिंदेंच्या जागाच कमी करत नाहीय तर असलेल्या काही जागांवर शिंदेंच्या उमेदवारांना भाजपच्या कमळावर लढण्यासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. तर शिंदेंचेच काही नेते स्वत:च कमळावर धनुष्यबाणाऐवजी कमळावर लढण्यासाठी उत्सूक असल्याचं दिसतंय. त्यामुळेच एकनाथ शिंदे दोन्ही बाजूनं ट्रॅपमध्ये सापडल्याचं दिसतंय. लोकसभेला जर शिंदेंना खरोखरच सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत शिंदेंचे अनेक शिलेदार एक तर भाजपात जाऊ शकतात नाही तर ठाकरेंच्या गोटात परतू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world