जाहिरात
This Article is From Mar 26, 2024

IPL 2024 : पहिल्या 6 मॅचमध्ये जुळून आला एक विलक्षण योग, तुमच्या लक्षात आला का?

IPL 2024 : या सिझनमधील पहिल्या मॅचपासून सुरु झालेली परंपरा सहाव्या मॅचपर्यंत कायम आहे.

IPL 2024 : पहिल्या 6 मॅचमध्ये जुळून आला एक विलक्षण योग, तुमच्या लक्षात आला का?
मुंबई:


जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) सुरुवात झालीय. या सिझनमध्ये एकूण 10 टीम खेळत असून प्रत्येक टीमचा किमान एक सामना झाला आहे. गेल्या दोन सिझनप्रमाणे यंदाही 74 सामने खेळले जातील. 26 मे रोजी चेन्नईत फायनल होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या 6 मॅचमध्ये एक विलक्षण योग जुळून आलाय.  

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या सिझनमधील पहिल्या मॅचपासून सुरु झालेली ही परंपरा पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (PBKS vs RCB) या सहाव्या मॅचपर्यंत कायम आहे.

काय आहे योग?

सोमवारी (25 मार्च) रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा सामना बंगळुरुमध्ये झाला. या सामन्यात यजमान आरसीबीनं 4 विकेट्सनं विजय मिळवला. पंजाबनं दिलेलं 177 रन्सचं आव्हान आरसीबीनं 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आरसीबीकडून विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वाधिक 77 रन्स केले. तर, अनुभवी दिनेश कार्तिकनं 10 बॉलमध्ये 28 रन्स करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. आरसीबीनं याबरोबरच होम ग्राऊंडवरील अभियानाची सुरुवात विजयानं केली.

या सिझनमध्ये होम ग्राऊंडवर विजय मिळवणारी आरसीबी ही पहिली टीम नाही. यापूर्वीच्या पाचही सामन्यात यजमान टीमनं होम ग्राऊंडवर विजय मिळवला आहे. या सिझनमधील पहिल्या सहाही सामन्यात यजमान टीमनं विजय मिळवला आहे.

काय आहेत पूर्वीचे निकाल?

सीएसके विरद्ध आरसीबी या सामन्यानं आयपीएल 2024 ला सुरुवात झाली. या सामन्यात यजमान सीएसकेनं आरसीबीचा 6 विकेट्सनं पराभव केला. बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान या विजयाचा हिरो ठरला होता. मुस्तफिजूरनं 4 विकेट्स घेतल्या. ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (DC vs PBKS) हा सामना सर्वांच्या लक्षात राहणार आहे. पंतच्या पुनरागमानानंतरही दिल्लीला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. यजमान पंजाबनं दिल्लीचा 4 विकेट्सनं पराभव केला.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) हा तिसरा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झाला. या सामन्यात यजमान केकेआरनं दिलेलं 209 रन्सचं आव्हान पूर्ण करण्यासाठी सनरायझर्सला फक्त 4 रन्स कमी पडले. राजस्थान रॉयल्सनं कॅप्टन संजू सॅमसनच्या नाबाद 82 रन्सच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा (RR vs LSG) 20 रन्सनं पराभव केला. या विजयासह राजस्थाननं जयपूरचा गड शाबूत राखण्यात यश मिळवलं.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (MI vs GT) हा पाचवा सामनाही चांगलाच गाजला. मागच्या सिझनमध्ये गुजरातचा कॅप्टन असलेला हार्दिक पांड्या यंदा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे. त्यामुळे या सामन्याला खास महत्त्व होतं. या सामन्यात यजमान गुजरातनं हार्दिकच्या मुंबई इंडियन्सचा 6 रन्सनं पराभव केला. यजमान टीम जिंकण्याची पाच सामन्यातील परंपरा आरसीबनं सहाव्या सामन्यातही कायम ठेवलीय.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com