जाहिरात
Story ProgressBack

IPL 2024 : लखनऊचा गुजरात टायटन्सवर 33 धावांनी विजय, गोलंदाजांचा प्रभावी मारा

तुलनेने कमी धावसंख्या उभारलेली असतानाही लखनऊच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा. यश ठाकूर आणि कृणाल पांड्याने लावला गुजरातच्या डावाला सुरंग

Read Time: 2 min
IPL 2024 : लखनऊचा गुजरात टायटन्सवर 33 धावांनी विजय, गोलंदाजांचा प्रभावी मारा
लखनऊ:

आयपीएलच्या सतराव्या हंगामात रविवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुलच्या लखनऊ सुपरजाएंट संघाने बाजी मारली आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना लखनऊने गुजरात टायटन्सवर 33 धावांनी मात केली. गुजरातला विजयासाठी 164 धावांचं माफक आव्हान होतं. परंतु लखनऊच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत गुजरातच्या धावाला खिंडार पाडलं. लखनऊकडून यश ठाकूरने निम्मा संघ गारद केला.

लखनऊची खराब सुरुवात, राहुल-स्टॉयनीसची संयमी खेळी -

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनऊ सुपरजाएंटची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी-कॉक आणि देवदत पडीक्कल यांना स्वस्तात माघारी धाडण्यात उमेश यादवला यश आलं. परंतु यानंतर लोकेश राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी लखनऊचा डाव सावरला.

दोघांनीही सर्वातआधी संघाची पडझड रोखली. मैदानात जम बसल्यानंतर दोघांनीही धावांचा ओघ वाढवायला सुरुवात केली. तिसऱ्या विकेटसाठी दोघांनीही 73 धावांची भागीदारी केली. परंतु प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतरही धावगती वाढण्यात दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. अखेरीस दर्शन नळकांडेने राहुलला बाद करत ही जोडी फोडली.

राहुल बाद झाल्यानंतर स्टॉयनिसने पूरनच्या साथीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतु ठराविक अंतराने तो देखील 58 धावा काढून बाद झाला. यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत लखनऊला 163 धावांचा पल्ला गाठून दिला. गुजरातकडून दर्शन नळकांडे आणि उमेश यादवने प्रत्येकी २-२ तर राशिद खानने १ विकेट घेतली.

आश्वासक सुरुवातीनंतर गुजरातच्या डावाला गळती -

प्रत्युत्तरादाखल गुजरातने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी सुरुवातीला आक्रमक फटके खेळले नसले तरीही पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करण्यात त्यांना यश आलं. यश ठाकूरने गिलला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर गुजरातच्या डावाची घसरगुंडीच उडाली.

अवश्य वाचा - IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, दिल्लीवर 29 धावांनी मात

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेला केन विल्यमसन आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही. रवी बिश्नोईने आपल्या गोलंदाजीवर त्याचा सुरेख कॅच घेतला. त्यानंतर गुजरातची अवस्था अवघ्या काही क्षणांमध्ये 4 बाद 61 अशी झाली. यानंतर गुजरातचा संघ सावरुच शकला नाही.

युवा यश ठाकूरने मोक्याच्या क्षणी महत्वाच्या विकेट घेत गुजरातचा संघ सामन्यात कमबॅक करु शकणार नाही याची काळजी घेतली. मधल्या फळीत राहुल तेवतियाने अखेरपर्यंत लढत देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्याचे प्रयत्नही तोकडेच पडले. ज्यामुळे गुजरातचा संघ 130 धावांत गारद झाला. लखनऊकडून यश ठाकूरने 5 विकेट घेतल्या. त्याला कृणाल पांड्याने 3 तर नवीन उल-हक आणि रवी बिश्नोईने 1-1 विकेट घेत चांगली साथ दिली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination