भारतीय क्रिकेटमध्ये सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भविष्यावरून मोठे नाट्य सुरू आहे. या दोन दिग्गज बॅटर्सच्या हाताळणीवरून ड्रेसिंग रूममध्येच धुसफूस वाढली असून, आता विराटने आगामी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. रोहित शर्माने खेळण्यासाठी होकार दिला असताना, कोहलीचा हा निर्णय BCCI साठी मोठी अडचण ठरत आहे.
कोहली आणि गंभीर यांच्यातील मतभेद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंध सध्या कोल्ड वॉरच्या दिशेने जात आहेत. कोहलीच्या भविष्यासंबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून दोघांमध्ये मतभेद आहेत. एका सूत्राने NDTV ला सांगितले की, एका बाजूला रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफी साठी BCCI निवड समितीला आपली उपलब्धता आधीच कळवली आहे. तो मॅच फिटनेस (Match Fitness) राखण्यासाठी सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेसाठीही उपलब्ध होता. तर दुसऱ्या बाजूला, कोहलीने देशांतर्गत होणाऱ्या या एकदिवसीय स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे.
( नक्की वाचा : Gautam Gambhir : गौतम गंभीरची 'ती' चूक महागात पडणार? BCCI चा पारा चढला, पडद्यामागे काय घडलं? )
कोहलीचा विरोध का?
रोहित शर्मा मुंबईकडून खेळण्यास उत्सुक असताना, विराट कोहलीचे मत वेगळे आहे. 'अतिरिक्त तयारी' (Excessive Preparation) करण्यावर त्याचा विश्वास नाही. रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर तो बोलला होता, "मी कधीच खूप तयारी करण्यावर विश्वास ठेवला नाही. माझा संपूर्ण क्रिकेट प्रवास मानसिक (Mental) तयारीवर आधारित आहे. मी शारीरिक मेहनत घेतो, पण त्यानंतर बॅटिंग चांगली होईल अशी कल्पना (Visualize) करणे महत्त्वाचे आहे." कोहलीच्या म्हणण्यानुसार, त्याने इतकी वर्षे जो पाया मजबूत केला आहे, त्यावर त्याचा विश्वास आहे आणि आता फक्त भारतासाठी एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
BCCI ची अडचण आणि निवड समितीचा दबाव
विराट कोहलीच्या या भूमिकेमुळे BCCI ची अवस्था 'इथे आड तिकडे विहीर' अशी झाली आहे. BCCI ला कोणत्याही खेळाडूला, तो विराट कोहलीसारखा मोठा खेळाडू असला तरी, विशेष सूट (Exception) द्यायची नाहीये. सूत्रांनी सांगितले की, "प्रश्न विजय हजारे ट्रॉफीचा आहे. तो खेळायलाच तयार नाही. रोहित शर्मा खेळत असताना, एका खेळाडूला सूट कशी देता येईल? मग इतर खेळाडूंना आम्ही काय सांगणार? की तो तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे?
देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा आग्रह
BCCI निवड समिती आणि प्रशिक्षक गंभीर यांचा उपलब्ध असलेल्या सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा सातत्याने आग्रह आहे. ऑस्ट्रेलियामधील वाईट टेस्ट सिरीज नंतर BCCI च्या आग्रहामुळेच रोहित आणि विराट या दोघांनीही रणजी ट्रॉफी खेळली होती. मात्र, आता कोहलीचा हा नकार BCCI ची धोरणे आणि इतर खेळाडूंसाठी चुकीचा पायंडा पाडण्याची भीती निर्माण करत आहे.
मध्यस्थीसाठी धावपळ
कोहली आणि गंभीर यांच्यातील बिघडलेले संबंध अधिक चिघळू नयेत यासाठी BCCI ने पाऊल उचलल्याचे कळते. NDTV सूत्रांनुसार, या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्ता प्रज्ञान ओझाला (Pragyan Ojha) रायपूरला पाठवण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी रायपूर हे ठिकाण आहे, जिथे ओझा हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world