रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फॅन्सचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. महिला आयपीएलच्या (WPL) दुसऱ्या सिझनमध्ये आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावलंय. पहिल्या सिझनमध्ये फक्त 2 मॅच जिंकणाऱ्या स्मृती मंधानाच्या टीमनं यावर्षी सर्वांचाच अंदाज चुकवला. त्यांनी निर्णयाक क्षणी खेळ उंचावत विजेतेपदाला गवसणी घातली. आयपीएलला 2008 पासून सुरुवात झाली. गेल्या 16 सिझनमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असूनही आरसीबीला विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर महिला टीमनं दुसऱ्याच सिझनमध्ये मिळवलेलं हे यश अधिक उठावदार आणि ऐतिहासिक आहे. विराट कोहली आणि कंपनीनं स्मृती मंधानाच्या टीमकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
नेमकं कारण शोधा
आरसीबीच्या महिला टीमला मागील सिझनमध्ये फक्त 2 मॅच जिंकता आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या ऑक्शनमध्ये बॅटिंगपेक्षा बॉलिंग बळकट करण्यावर भर दिला. या रणणिनीतीचा त्यांना मोठा फायदा झाला. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत पहिल्या तिघीही आरसीबीच्या होत्या. श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि सोफी मौलिनो या तिघींनी या जागा पटकावल्या.
आरसीबीच्या पुरुष टीमनंही या ऑक्शनमध्ये फास्ट बॉलर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. बंगळुरुच्या फलंदाजांना मदत करणाऱ्या मैदानात बॉलिंग अटॅक मजबूत करणे ही चांगली रणनीती ठरु शकते. आरसीबीनं या रणनीतीवर कायम राहात फास्ट बॉलर्सला भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. बॉलर्सना मॅनेजमेंटचा पाठिंबा आणि प्रयोग करण्यास स्वातंत्र्य दिलं तर ते नक्कीच कमाल करु शकतील.
शांत ड्रेसिंग रुम
एक दोन पराभवानंतर आरसीबीचे खेळाडू दबावात आले आहेत हे जाणवू लागतं. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत सुरुवातीच्या पराभवानंतर कमबॅक करण्याची संधी असते. सुरुवातीचे निकाल प्रतिकूल गेले तरी खेळाडूंना ड्रेसिंग रुममधून भक्कम पाठिंबा असेल, ड्रेसिंग रुममधील वातावर शांत आणि आनंदी असेल तर विजेतेपद मिळवता येतं, हे आरसीबीच्या महिला टीमनं दाखवून दिलंय. पुरुषांच्या टीमनंही महिलांचा हा धडा गिरवण्याची गरज आहे.
प्रमुख खेळाडूची जबाबदारी
शेवटच्या टप्प्यात आरसीबीच्या विजयात एलिसा पेरी या प्रमुख खेळाडूनं मोठी जबाबदारी निभावली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या एलिमेनेटर मॅचमध्ये एका बाजूनं विकेट जात असतानाही पेरीनं संयम सोडला नाही. तिनं एक बाजू लावून धरत शेवटपर्यंत मैदान लढवलं. फायनलमध्येही ती विजेतेपदावर शिक्कामोर्तब करुनच परतली.
आरसीबीच्या पुरुषांची टीम ही विराट कोहलीवर अवलंबून आहे. निर्णायक टप्प्यात विराटनं जबाबदारी ओळखून आपण मॅच गमावणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आयपीएल 2016 मधील फायनलमध्ये विराट बाद झाल्यानंतरच आरसीबीची इनिंग कोसळली. आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वात चांगली संधी आरसीबीनं गमावली होती. यंदा ही चूक होणार नाही याची काळजी विराटनं घ्यायला हवी. त्यासाठी त्यांच्याच महिला टीममधील एलिसा पेरीचा विराटसमोर आदर्श आहे.
'होम ग्राऊंड' करा बालेकिल्ला
चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल विजेतेपदात त्यांनी चेपॉकमध्ये केलेल्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. चेपॉकचं मैदान महेंद्रसिंह धोनीच्या टीमचा बालेकिल्ला आहे. आरसीबीच्या महिला टीमनंही यंदा होम कंडिशनचा चांगला उपयोग केला. दिल्लीमध्ये झालेल्या साखळी सामन्यातील फक्त 1 मॅच जिंकूनही आरसीबीनं विजेतेपद पटकावलं. घरच्या मैदानावरील दमदार कामगिरीमुळेच हे शक्य झालं. फाफ ड्यू प्लेसिसच्या टीमनंही महिलांप्रमाणे घरचं मैदान बालेकिल्ला बनवलं तर इतर टीम्सना त्यांना रोखणं अवघड होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world