विधानसभा निवडणुकीच्या एकदिवस आधी भाजपला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माहीम विधानसभेचे उपाध्याय सचिन शिंदे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. सचिन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माहीम विधानसभेच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. अमित ठाकरे-सदा सरवणकर-महेश सावंत अशी तिहेरी लढत इथे होत आहे. मात्र निकालाआधी घडलेल्या या घडामोडीमुळे सर्वांच लक्ष इथे वेधलं गेलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजप सोडताना सचिन शिंदे यांनी म्हटलं, की, मी गेली 20 वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. पक्षवाढीसाठी काम केलं माझ्यावर अन्याय झाला म्हणणार नाही, पण न्याय देखील मिळाला नाही, असं सचिन शिंदे यांना म्हटलं. मी उद्धव ठाकरेंना भेटलो माझ्या कामात ते सहकार्य करणार आहेत. माझ्या परिने मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्या सोबत उभे आहेत. मी अत्यंत विचारपूर्वक, जनतेच्या सेवेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे.
सचिन शिंदे नेमकं काय म्हणाले?
"भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेताना मला स्पष्ट करावेसे वाटते की भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यावर अन्याय झालेला नाही, मात्र योग्य न्यायही मिळालेला नाही ही खंत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी दादर-माहीम विभागात पक्ष-संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाच्या धोरणांचे पालन करत सामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवले आणि पक्षवाढीसाठी संपूर्ण योगदान दिले. मात्र, या सर्व योगदानाला सन्मान व प्रोत्साहन मिळाले नाही", अशी नाराजी सचिन शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटात मला संधी मिळेल!
"माझ्या निर्णयाचा आधार हा कोणाविषयी नाराजी नसून, व्यापक लोकसेवेची अधिक संधी आणि जबाबदारी मिळावी, हाच मुख्य हेतू आहे. आज जनतेच्या समस्या अधिक गहन व व्यापक झाल्या आहेत. त्यासाठी अधिक प्रभावी व तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षामध्ये मला ही संधी मिळेल आणि मी माझे कर्तव्य अधिक प्रभावीपणे बजावू शकेन", असंही सचिन शिंदे यांनी म्हटलं आहे.
(ट्रेंडिंग बातमी - निवडणुकीच्या निकालानंतर 48 तास का महत्त्वाचे? कशी असेल सत्ता स्थापनेची प्रक्रिया?)
"भाजपमधील माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या कार्याला पाठिंबा देणारे असंख्य कार्यकर्ते व नागरिक आजही माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांनी माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला न्याय देण्यासाठी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करेन", अशा विश्वास सचिन शिंदे यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world