
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर काही दिवसांपूर्वी दोन आरोपींनी मोटारसायकल वरुन येत गोळीबार केला होता. या घटनेदरम्यान सलमान खान घरातच असल्यामुळे साहजिकच पोलीस यंत्रणांची चक्र पटापट फिरली. अवघ्या 2-3 दिवसांमध्ये आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला यश आलं. अटक केलेले आरोपी हे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचं बोललं जातय. या सर्व घडामोडींमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.
सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ -
गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. आरोपींना अटक केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी सलमानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी सलमानसह त्याचे वडील सलीम खानही घरी हजर होते. शिवसेना नेते राहुल कनाल, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे देखील यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंनी सुरक्षा-व्यवस्थेबद्दल सलमान खानच्या परिवाराशी सविस्तर चर्चा केली.
राज ठाकरेंनीही घेतली होती सलमान खानची भेट -
गोळीबार घडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही रात्री सलमान खानच्या घरी भेटीस गेले होते. राज ठाकरे आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांचं जुनं नातं आहे. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे याचा दाखलाही देत असतात. मागच्या वर्षात मनसेच्या दिवाळी कार्यक्रमातही राज ठाकरेंनी सलीम खान व जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.
सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात -
माझी आणि सलमान खानच्या परिवाराशी भेट झाली, सरकार त्यांच्यासोबत आहे हा विश्वास मी त्यांना दिला आहे. घटना घडल्यानंतर मी पोलीस आयुक्तांना तात्काळ या आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी होईल. यात जे कोणही सहभागी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
कोणाचीही दादागिरी चालणार नाही, बिश्नोई गँगला धुळीस मिळवू -
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात बिश्नोई गँगच्या सदस्यांचा सहभाग समोर येतो आहे. बिश्नोई गँग मुंबईत आपला दबदबा पसरवू पाहत आहे का असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला असता त्यांनी कठोर प्रतिक्रीया दिली. "ही मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. इथे कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. बिश्नोई गँगला आम्ही संपवून टाकू. इथे कोणतीही गँग आली तरीही त्यांना मुळापासून उखडून टाकण्यात, मातीत मिळवण्यात पोलीस समर्थ आहेत. सलमानच्या परिवाराची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहेत. त्यांच्या सुरक्षेत वाढ करायच्या सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत."
मुंबई पोलिसांनी आरोपींच्या अटकेबाबत काय दिली माहिती?
मुंबई क्राइम ब्रांचचे सह-पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "आता या प्रकरणामध्ये कलम 120B देखील जोडण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी क्राइम ब्रांचने एकूण 12 पथक तयार केले होते. आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. आरोपींकडे हत्यारे होती, त्यामुळे भूज पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी विमानाने आरोपींना मुंबईमध्ये आणले गेले. यानंतर न्यायालयाने आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील दोन आरोपींपैकी सागर पाल यापूर्वी दोन वर्षांकरिता हरियाणामध्ये काम करत होता. याचदरम्यान सागर बिश्नोई गँगच्या संपर्कामध्ये आला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world