जाहिरात

उद्योजकाचा तरुणावर गोळीबार, पुण्यात चाललंय काय ?

पुण्यातील हवेलीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यावसायिकाने जमिनीच्या वादातून एका तरुणावर गोळीबार केला.

उद्योजकाचा तरुणावर गोळीबार, पुण्यात चाललंय काय ?
पुणे:

राहुल कुलकर्णी

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. हिट अँड रन, पोलिसांवर होणारा जीवघेणा हल्ले, कोयता गँगची दहशत, भर वस्तीमध्ये होणाऱ्या हत्या या घटना ताज्या असताना  पुण्यातील हवेलीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यावसायिकाने जमिनीच्या वादातून एका तरुणावर गोळीबार केला. रिंगरोडसाठीच्या जमिनीच्या व्यवहारातील पैशांवरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे कळते आहे. 

हे ही वाचा : पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडणार, पुणे-शिरूर महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी

मिळालेल्या माहितीनुसार या गोळीबाराच्या घटनेत काळुराम महादेव गोते (वय 35 वर्षे) रा. भिवरी यांच्यावर गोळीबार झाला असून त्याच्या पायाला आणि हाताला गोळ्या लागल्या आहेत. काळुराम गोते याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून गोळीबाराच्या घटनेनंतर शितोळे फरार झाला होता.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी सकाळी घडली. ऊरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गोळीबार करण्यात आला आहे. इथल्या इमानदार वस्ती येथे शितोळे यांच्या घरी रिंगरोडच्या जमिनीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी गोते गेला होता. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला होता. वादाचे रुपांतर गोळीबारात झाले.  पोलिसांनी शितोळे याला अटक केली आहे.

पुण्यातील हिट अँड रनमध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

पुण्यातल्या पौड फाटा परिसरात 8 सप्टेंबर रोजी रात्री एका मद्यधुंद टेम्पो ड्रायव्हरने दोन ते तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात गीतांजली श्रीकांत अमराळे (34) यांचा मृत्यू झाला आहे.  गीतांजली त्यांचे पती श्रीकांत यांच्यासोबत 8 सप्टेंबर रोजी रात्री 9.15च्या सुमारास त्या भागातून जात होत्या. त्याचवेळी एका मद्यधुंद टेम्पो ड्रायव्हरने त्यांना मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गीतांजली यांचा त्यात मृत्यू झाला.

अलंकार पोलीस स्टेशनमध्ये 27 वर्षीय टेम्पो ड्राइवर आशिष अनंत पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो दारूच्या नशेत पिकअप कार चालवित होता. या अपघातात गीतांजली यांचे पती श्रीकांत अमराळे गंभीर जखमी आहेत. ते मनसे कोथरुडचे जन विभागाचे अध्यक्ष आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com