जाहिरात

Cancer Test: महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम, सरकारचा मोठा निर्णय

Thane Civil Hospital: रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव सोना यांना दिले.

Cancer Test: महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम, सरकारचा मोठा निर्णय
Thane News: ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला (Photo- Gemini AI)
मुंबई:

ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे, या दृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच 1078 नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. याचसोबत, राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

ठाणे सिव्हील हॉस्पीटलसाठी बैठक

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायक, विरेंद्र सिंह, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, आरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आरोग्य संचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांसारखे अधिकारी उपस्थित होते.

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार

ठाणे जिल्हा रुग्णालय अद्ययावत होत असून त्यामध्ये 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचे महिला रुग्णालय आणि 200 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण 900 खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे. त्याचे 80 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरण, यंत्रसामुग्री बसवणे यांसारखी कामे सुरू आहेत. साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या 900 खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे 1078 नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करतानाच अद्ययावत यंत्रसामुग्री बसवण्यावर भर देण्यात यावा. मंत्रालयात या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव सोना यांना दिले. हे जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्ह्यासोबतच रायगड, नवी मुंबई, पालघर या भागातील नागरिकांसाठी वरदान ठरेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

महापालिका रुग्णालयात महिलांची कर्करोग तपासणी 

ठाणे जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतानाच राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहीम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती, त्यांना लागणारी औषधे, साहित्यसामुग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री, सचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com