
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. मान्सूनने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. कोकण पुणे मुंबईतमध्ये पावसामुळे सर्वांचीच एकच धावपळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली आहे. पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
तर फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे. सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world