अभिषेक मुठाळ, मुंबई
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोबाईलच्या साहाय्याने घोळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या मोबाईलवरुन हे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. मात्र असा कोणाताही घोळ झाला नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं आहे.
ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागत नाही, त्यामुळे मोबाईलचा काहीही संबंध नाही. ईव्हीएम स्टॅंडअलोन सिस्टिमवरील टेक्नोलॉजीवर काम करते. कम्युनिकेशन डीव्हाईस कनेक्ट होऊ शकत नाही. ईव्हीएम कोणत्याही वायरने कनेक्ट नसतं. तिथे मोबाईलचा काही संबंध नाही. पोलिंग एजंट देखील तिथे असतात, त्यांच्या समोरच हे सर्व होत असतं, असं वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं.
(नक्की वाचा- EVM शी जोडलेला होता वायकरांच्या निकटवर्तीयाचा फोन? त्या मोबाइलमुळे खळबळ, दोघांना नोटीस)
काही लोकांना आम्ही मोबाईल ठेवण्याची परवानगी दिली होती, त्यात निवडणूक अधिकारी होते. त्यातलेच ते गुरव होते आणि त्यांचा तो वैयक्तिक मोबाईल होता. कायदेशीर तरतूदींचे पालन न करता गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे सीसीटीव्ही देतो असं आम्ही अमोल किर्तीकरांना सांगितलं होतं. सीसीटीव्हीसंदर्भात जोपर्यंत कोर्टाकडून निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत सीसीटीव्ही कोणालाही दिले जाणार नाही. पोलिसांना देखील सीसीटीव्ही दिले जाणार नाही, असं वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मतमोजणी केंद्रात फोन वापरल्याने अडचणीत आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पांडिलकरवर गुन्हा दाखल केला आहे. मंगेश पांडिलकर यांनी 4 जून रोजी गोरेगाव येथील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेदरम्यान मतमोजणी केंद्रात फोन वापरला होता.
(नक्की वाचा- एलन मस्क यांच्याकडूनही सवाल, राहुल गांधी म्हणतात ब्लॅक बॉक्स; EVM हॅक करणं खरंच शक्य आहे का?)
मंगेश पांडिलकर हा फोन वापरत असल्याचे वनराई पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी ओटीपी जनरेट करण्यासाठी हा मोबाईल फोन वापरला असल्याचे बोललं जात आहे. मोबाईल फोनचा डेटा तपासण्यासाठी पोलिसांनी तो मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी मंगेशा पांडिलकर आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांना नोटीस बजावली आहे. एनकोर ही एक सिस्टिम आहे, ज्यात डेटा एन्ट्री होत असते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world