
छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर पंक्चर झाल्याच्या घटनेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मोठी कारवाई केली आहे. पुलावरील भेगा बुजवण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे संबंधित कंत्राटदार सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीटीव्ही मराठीने या घटनेचे वृत्त सर्वप्रथम दिले होते आणि त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे.
समृद्धी महामार्गावरील पुलावर पडलेल्या भेगा भरण्यासाठी ‘मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीने ‘नोजल्स' बसवले होते. मात्र, काम सुरू असताना ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यासाठी मजबूत बॅरिकेडिंग आणि चांगल्या दर्जाचे रिफ्लेक्टर लावणे गरजेचे होते. परंतु, कंत्राटदार सत्यनारायण यांनी या नियमांचे पालन केले नाही आणि निष्काळजीपणा केला. याच निष्काळजीपणामुळे काही वाहनांचे टायर पंक्चर झाले होते. सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना घडली नाही.
(नक्की वाचा- Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले? MSRDC चं स्पष्टीकरण आलं समोर)
कंत्राटदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल
या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर एनडीटीव्ही मराठीने हे प्रकरण लावून धरले आणि त्याचाच परिणाम म्हणून आता कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात महामार्गावर काम करणाऱ्या इतर कंत्राटदारांवरही योग्य सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा दबाव येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(नक्की वाचा - Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावरील ते खिळे नव्हते; मग नेमकं काय घडलं? कंत्राटदाराचा वेगळाच दावा)
नेमकं काय घडलं?
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर मुंबई दिशेकडील पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण 15 मीटर लांबीचे सूक्ष्म तडे आढळले होते. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाअंतर्गत, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘इपॉक्सी ग्राउटिंग'द्वारे हे तडे भरण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' लावावे लागतात. दरम्यान, या ठिकाणी 'ट्रॅफिक डायव्हर्जन'साठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही एमएसआरडीसीने म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world