जगतगुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले असून आज दोन्ही पालखींचा मुक्काम पुण्यात असणार आहे. वाढणारी गर्दी पाहता पुण्यातील वाहतुकीत (Pune Traffic changes) मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज पुण्याच्या (Pune News) दिशेने प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाणून घ्या.
आज पहाटे आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं. दोन दिवसांपूर्वी देहूतून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आज दोन्ही पालखी पुण्यात एकत्र येणार आहेत. पुण्यातच दोन्ही पालखींचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे भाविकांची वाढणारी गर्दी पाहता वाहतुकीच बदल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
पोलिसांकडून वाहतूक बदलाच्या सूचना : पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी (Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Mauli Palkhi) आगमन आणि मुक्कामाच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते. या पालखी सोहळ्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी गूगल मॅप सोबत तसेच गूगल मॅपवर नागरिकांना वाहतूक बदल कळवण्यात येणार आहेत. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना मदत होणार असल्याचं यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच या सोबत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आगमन आणि मुक्काम वेळी वाहने चालवणे टाळण्याचे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे. या सोबत वाहतूक बदलाच्या सूचना पुणे पोलिसांच्या विविध समाज माध्यमावरून दिल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुगल लिंक तयार करण्यात आली असून यामाध्यमातून प्रवाशांना कोणते रस्ते खुले किंवा वळवण्यात आले, याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
- रविवारी बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, कमलनयन बजाज चौक, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवडा येथील मनोरूग्णालय ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
- दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून मुक्कामस्थळी पोहोचतील.
- अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वेधशाळा चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक, खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारूती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारूती चौक, नाना पेठ पोलीस चौकी येथून संत तुकाराम महाराजांची पालखी अरूण चौक मार्गावरून निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामासाठी येणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गावरून भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामाला येईल.
- पालख्यांच्या आगमनानिमित्त पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
- 2 जुलै रोजी पालखी प्रस्थानावेळी संपूर्ण पालखी मार्गावर येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world