सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी किती बारीक आणि हुशारीच्या युक्त्या वापरू शकतात, याचा अनुभव मुंबईतील मॅरिटाईम कंपनीला आला आहे. एका अमेरिकन कंपनीच्या ईमेल आयडीमध्ये केवळ एका अक्षराचा बदल करून सायबर भामट्यांनी या मुंबईस्थित कंपनीला तब्बल 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅरिटाईम कंपनीचे दिल्ली, चेन्नई आणि कोचीनमध्येही ऑफिस आहेत. ही कंपनी परदेशातून जहाजाने भारतात पाठवल्या जाणाऱ्या मालासाठी दलाल म्हणून काम करते आणि गेल्या 20 वर्षांपासून एअर सेव्हन सीज नावाच्या यूएस-आधारित कंपनीसोबत व्यवसाय करत आहे. आर्थिक व्यवहारांसंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये नियमितपणे ईमेलद्वारे चर्चा होते. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- 'कर्ज काढा, कर्जबाजारी व्हा, आणि कर्जमाफी मागा!', राधाकृष्ण विखे पाटलांचं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान)
नेमकी फसवणूक कशी झाली?
या फसवणुकीची सुरुवात 19 ऑगस्ट 2025 रोजी झाली. मुंबईतील कंपनीचे व्यवस्थापक आणि वित्त प्रमुखांना एक ईमेल प्राप्त झाला. हा ईमेल अमेरिकेच्या 'एअर सेव्हन सीज' कंपनीकडून आल्याचा भास झाला.
मूळ ईमेल आयडी: finance3@air7seas.us
फसवणूकदारांनी वापरलेला ईमेल आयडी: finance3@a1r7seas.us (यामध्ये 'i' ऐवजी '1' वापरला गेला होता.)
या बनावट ईमेलमध्ये मुंबईतील कंपनीला त्यांच्याकडे असलेली थकबाकी हस्तांतरित करण्यासाठी नवीन बँक खाते अपडेट करण्यास सांगण्यात आले. मुंबईच्या कंपनीने त्याप्रमाणे बँक खात्याचा तपशील बदलला आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान या नवीन खात्यात सुमारे 29 लाख रुपये जमा केले.
(नक्की वाचा- Ro ro Service: 'रो-रो'ची वॅगन वहन क्षमता वाढली, आता 'इतके' टन वाहतूक होणार!)
फसवणूक झाल्याचं कळताच तक्रार
3 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कंपनीने अमेरिकेतील भागीदारांना पेमेंटबद्दल ईमेल केला, तेव्हा अमेरिकन कंपनीने असे कोणतेही पेमेंट मिळाले नसल्याचे आणि कोणतेही खाते बदलले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी ईमेल आयडीची तपासणी केली असता, मूळ ईमेल आयडीमध्ये 'i' ऐवजी '1' चा वापर केल्याची गंभीर चूक त्यांच्या लक्षात आली. यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा 'मॅन इन द मिडल' सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world