मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ब्रिटीश काळातील मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव केला होता. याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. भारतीय पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावंदेखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती म्हणून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्याचं शेवाळेंनी सांगितलं. दरम्यान जुन्या आणि नव्या नावांमागील इतिहास जाणून आणि समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
या ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार...
करी रोड - लालबाग
सॅन्डहर्स्ट रोड - डोंगरी स्टेशन
मरीन लाइन्स - मुंबा देवी
चर्नी रोड - गिरगाव
कॉटन ग्रीन - काळा चौकी
किंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ
डॉकयार्ड - माझगाव
मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकर सेठ
करी रोड - ब्रिटीशकाळात जीआयपी, बीबीसीआय सारख्या रेल्वे कंपन्यांच्या देखरेखीचं काम करणारे एजेंट सी. करी यांच्या नावावरुन या स्थानकाला करी रोड हे नाव पडलं. सी.करी हे १८६५ ते १८७५ या कालावधीत बॉम्बे-बडोदा आणि मध्य भारतील रेल्वेचं एजंटचं काम करीत होते.
प्रस्तावित नाव - लालबाग
१४ व्या शतकात इथं हजरत लाल शाह बाबा किंवा लाल शाह साबचा दर्जा होता, त्यामुळे या भागात लालबाग नाव देण्यात आलं. तर काहींच्या मते येथील सूतगिरण्यांमध्ये काम करणारे अधिकांश कामगार कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा लाल होता आणि ते लाल सलाम असं म्हणायचं. यातूनच या भागाला लालबाग असं नाव पडलं असावं, असं सांगितलं जातं.
---
सँडहर्स्ट रोड - 125 वर्षांपूर्वी मुंबईत प्लेगची साथ आली, तेव्हा मुंबईत लॉर्ड सँडहर्स्ट नावाचे एक गव्हर्नर होते. त्यावेळी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईतील अनेक गोष्टी सुधारण्याकरिता प्रयत्न केले. अनेक योजना करण्यात आल्या. हा रस्ता चौपाटीपासून ते डोंगरीपर्यंत होता. या रस्त्याचे नाव सँडहर्स्ट रोड होते. त्याच्याजवळच हे रेल्वेस्थानक स्थलांतरित करण्यात आलं आणि रस्त्याच्या नावावरुन स्थानकाला सँडहर्स्ट नाव देण्यात आलं.
प्रस्तावित नाव - डोंगरी
डोंगर या शब्दावरुन डोंगरी हे नाव देण्यात आलं असून या स्थानकाच्या जवळ डोंगरी नावाचा परिसर आहे. त्यामुळे डोंगरी हे नाव प्रस्तावित आहे.
---
मरीन लाइन्स - 19 व्या शतकात या भागात ब्रिटीशकालीन मरिन बटालियनचे बॅरेक्स होते. यावरुन जवळील स्टेशनचं नाव मरीन लाइन्स देण्यात आलं. कालांतराने या बटालियन इमारतीचं रुपांतर वायुदलातील सैनिकांच्या घरांमध्ये करण्यात आलं.
प्रस्तावित नाव - मुंबा देवी
मरीन लाइन्सपासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीचं सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच्या नावावरुन मरीन लाइन्सचं नाव बदलून मुंबादेवी ठेवण्याची मागणी करण्यात आली. मुंबई हे नावदेखील मुंबादेवीवरुन ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.
---
चर्नी रोड
१८४८ च्या सुमारास ब्रिटीशांनी सार्वजनिक ठिकाणी गुरे चरण्यासाठी कर लावला होता. तेव्हा बहुतेकांना तो परवडणारा नव्हता. त्यामुळे जमशेटजी जीजीभॉय यांनी या भागात जनावरांना चरण्यासाठी एक मोठा भूखंड खरेदी केला. यासाठी त्यांनी स्वत:चे २० हजार रुपये खर्च करून ठाकूरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्याजवळील जमीन विकत घेतली आणि तेथे जनावरांना विनाशुल्क चरण्याची परवानगी दिली. त्यामुळे १८६७ मध्ये बांधलेल्या या स्थानकाचे नाव चरणे यावरुन चर्नी रोड ठेवण्यात आले.
प्रस्तावित नाव - गिरगाव
मलबार हिलच्या तळाशी मुंबईतील गिरगाव आहे. संस्कृत शब्द गिरी म्हणजे टेकड्या आणि ग्राम म्हणजे गाव. त्यामुळे याचा मूळ अर्थ डोंगराच्या पायथ्याशी असलेले गाव असा होतो.
---
कॉटन ग्रीन
कॉटन ग्रीन एक ऐतिहासिक स्थळ आहे. इथूनच भारतात कापसाचा व्यापार सुरू झाल्याचं मानलं जातं. ब्रिटीशांच्या काळात या भागात कापसाची गोदामं होती. या भागात कॉटन एक्सचेंजची एक इमारत आजही उभी आहे. आजूबाजूला हिरवागार परिसर असल्याने येथील आर्ट डेको शैलीत बांधलेल्या इमारतीला हिरवा रंग देण्यात आला होता. त्यामुळे या स्थानकाला कॉटन ग्रीन असं नाव देण्यात आलं.
प्रस्तावित नाव - काळाचौकी
काळाचौकी या पोलीस ठाण्यावरुन याचं नाव काळाचौकी देण्याचं प्रस्तावित आहे.
---
किंग्ज सर्कल
किंग जॉर्ज पाचवे यांच्या नावावरून किंग्ज सर्कल हे नाव पडलं. किंग जॉज पाचवे हे इंग्लंडचे राजे होते. किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी भारतात येण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया बांधले गेले होते आणि याच गेटमधून त्यांनी भारतात प्रवेश केला होता.
प्रस्तावित नाव - तीर्थंकर पार्श्वनाथ
तीर्थकर पार्श्वनाथ या जैन देवाचे ऐतिहासिक मंदिर किंग्ज सर्कल या ठिकाणी आहे. याच कारणामुळे या स्टेशनचं नाव तीर्थकर पार्श्वनाथ असं ठेवण्यात येणार आहे. भगवान पार्श्वनाथ हे जैनांचे तेवीसावे तीर्थकर होते.
---
डॉकयार्ड
या रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या नौदलाच्या तळावरुन याला डॉकयार्ड रोड असं ना देण्यात आलं. ब्रिटीश काळात जहाजबांधणी आणि दुरुस्तीसाठी वापरलं जाणारं बॉम्बे डॉकयार्ड येथून जवळ आहे.
प्रस्तावित नाव : माझगाव
मुंबई ज्या सात बेटांनी बनली आहे, त्यापैकी माझगाव हे एक बेट होते. माझगावच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी गोदी आहे. मुंबईतल्या माझगाव नावाच्या परिसरावरून हे नाव मिळालं आहे.
---
मुंबई सेंट्रल
मुंबईच्या मधोमध असल्यामुळे 1930 साली बांधण्यात आलेल्या स्थानकाला मुंबई सेंट्रल हे नाव पडलं होतं. १९९७ मध्ये बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केल्यानंतर स्टेशनचं बॉम्बे सेंट्रल नाव बदलून मुंबई सेंट्रल करण्यात आलं.
प्रस्तावित नाव - नाना जगन्नाथ शंकरसेठ
नाना शंकर सेठ मुंबईचे शिल्पकार होते. जगन्नाथ शंकरसेठ मुरकुटे हे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world