- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिलं उड्डाण होणार आहे.
- सिडकोच्या प्रयत्नांनी विकसित विमानतळ अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आहे.
- विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी महामार्ग, रेल्वे, मेट्रो आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे सुलभ होणार आहे
राहुल कांबळे
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) या देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाच्या यशस्वी उभारणीने, भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अध्याय जोडला गेला आहे. सिडकोच्या अंमलबजावणीचे हे भव्य प्रतीक आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी येथून पहिली विमानसेवा सुरू होत आहे. नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते असं सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले.
हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो. या प्रवासात विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे सामूहिक यश आहे असं ही ते यावेळी म्हणाले. या प्रकल्पामध्ये नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यान्वयनापर्यंत अनेक दशकांचा हा प्रवास आहे. या प्रकल्पामध्ये अत्यंत काटेकोर नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. नियोजित मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदाणी समूह, तसेच एनएमआयएएल यांचे मनःपूर्वक आभार नोंदविले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली असून, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरते. महाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेल्या उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टीची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदाणी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला आहे. महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिला आहे.
हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका तसेच प्रस्तावित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. अत्याधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक रचना आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण देत, देशाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे.
पहिल्या दिवशीची विमानसेवा – 25 डिसेंबर 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- एकूण विमान संचालन – पहिल्या दिवशी एकूण 30 एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (ATMs)
- विमान कंपनी – इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर
महत्त्वाच्या उड्डाण वेळा:
• पहिले आगमन:
✈️ 6E 460 – बेंगळुरू येथून – सकाळी 08.00 वाजता
• पहिले प्रस्थान:
✈️ 6E 882 – हैदराबादकडे – सकाळी 08.40 वाजता
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world