
राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबईसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरासाठी आता अधिक सक्षम पोलीस यंत्रणा तयार करण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने २३ जुलै २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करत नवीन ‘परिमंडळ-२ – बेलापूर' ची स्थापना करण्यात आली आहे.
शहरातील वाढते शहरीकरण, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कॉस्टल रोड, अटल सेतू, आणि विमानतळाला जोडणारे रस्ते तसेच मेट्रो यामुळे शहरात नागरिकांची व वाहतुकीची घनता लक्षणीय वाढली आहे. परिणामी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाण्यांची आणि मनुष्यबळाची गरज अधिक तीव्र झाली आहे.
तीन परिमंडळांची नव्याने रचना
नवीन निर्णयानुसार आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात खालील तीन परिमंडळ असतील:
1. परिमंडळ-१ – वाशी
2. परिमंडळ-२ – बेलापूर (नवीन)
3. परिमंडळ-३ – पनवेल
( नक्की वाचा : Nalasopara Murder: 'ती'चूक केली आणि पतीची हत्या करणारे पत्नी -बॉयफ्रेंडचा खेळ झाला खल्लास! )
बेलापूर परिमंडळासाठी स्वतंत्र यंत्रणा
बेलापूर परिमंडळासाठी विशेषत: खालील पदांची निर्मिती करण्यात आली आहे:
१ पोलीस उपआयुक्त (DCP)
२ सहायक पोलीस आयुक्त (ACP)
या तीन पदांच्या स्थापनेसाठी सरकारने ₹३८,१८,५८०/- इतक्या वार्षिक खर्चास मान्यता दिली आहे. हा खर्च संबंधित वर्षातील शासनाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पार्श्वभूमी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९ नोव्हेंबर १९९४ रोजी करण्यात आली होती. त्यावेळी यामध्ये वाशी, नेरुळ, तुर्भे, पनवेल, तळोजा, उरण, कळंबोली व न्हावाशेवा अशा ८ पोलीस ठाण्यांचा समावेश होता.
त्यानंतर २००६ मध्ये पनवेल तालुका पोलीस ठाणे रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयातून नवी मुंबई आयुक्तालयात वर्ग करण्यात आले. आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ६८८ चौ.कि.मी.हून अधिक आहे आणि सध्याची लोकसंख्या ५८-६० लाखांच्या दरम्यान असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Akola : ब्लॅकमेलिंग, पैशांची मागणी आणि...संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्षाला महिलेकडून चोप, पाहा Video )
काय आहेत मुख्य वैशिष्ट्य?
या निर्णयामुळे बेलापूर, सीबीडी, कोपरखैरणे, खारघर, आणि तळोजा परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. स्वतंत्र डीसीपी परिमंडळामुळे गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आणि स्थानिक तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होईल.
राज्य सरकारचा हा निर्णय भविष्यातील नवी मुंबईच्या विस्ताराची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. पायाभूत सुविधा, मोठ्या प्रकल्पांची गुंतवणूक आणि नागरी वाढीचा विचार करता, पोलिस प्रशासनाची क्षमता वाढवणे ही काळाची गरज होती. बेलापूरला स्वतंत्र परिमंडळ मिळाल्याने शहराच्या प्रशासकीय नकाशात एक महत्त्वाची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world