
PM Modi in Mumbai : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी (13 जुलै) पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले. मुंबईतील 29 हजार 400 कोटींच्या वेगवेगळ्या लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून ती जगाची आर्थिक राजधानी करण्याचं माझं स्वप्न असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलून दाखवली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी चांगली होईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीमध्येही हातभार लागेल, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. महाराष्ट्र पर्यटनामध्येही देशातील नंबर वन राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
( नक्की वाचा : नेपाळमध्ये पुन्हा 'ओली सरकार' चीनची चांदी की भारताचा फायदा? )
एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकतं, हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करणार आहे, असं मी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर म्हटलं होतं. आज हे काम होताना पाहू शकतोय, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी मुंबईतील कोस्टल रोड आणि अटल सेतूचाही उल्लेख केला. अटल सेतूचं काम सुरु असताना याविरोधात अनेक गोष्टी पसरवल्या जात होत्या पण, आज याच अटल सेतूचा मोठा फायदा होतोय, याची आठवण त्यांनी करुन दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world