जाहिरात

Pune News: पुण्यात ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, 400 ऐवजी 800 रुपये तिकीट! परिवहन मंत्री कधी लक्ष देणार?

Pune News : एसटीच्या अपुऱ्या नियोजनाचा फायदा घेत खाजगी बस ऑपरेटर मनमानी दराने भाडे वसूल करून प्रवाशांची लूट करत आहेत.

Pune News: पुण्यात ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, 400 ऐवजी 800 रुपये तिकीट! परिवहन मंत्री कधी लक्ष देणार?
Pune News : पुण्यात ST बसचं आरक्षण फुल असल्यानं खासगी बस चालकांकडून मनमानी लूट सुरु आहे.
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune News : दिवाळीच्या निमित्तानं पुणे शहरातून आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या अतिरिक्त गर्दीमुळे पुण्यातील प्रमुख बसस्थानके असलेल्या शिवाजीनगर आणि स्वारगेट येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासासाठी एसटी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना प्रचंड प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटीच्या अपुऱ्या नियोजनाचा फायदा घेत खाजगी बस ऑपरेटर मनमानी दराने भाडे वसूल करून प्रवाशांची लूट करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

प्रमुख मार्गांवरील आरक्षण 'हाऊसफुल'

पुण्याहून बाहेर जाणाऱ्या पुणे-नाशिक, पुणे-अहिल्यानगर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा आणि पुणे-जळगाव यांसारख्या प्रमुख मार्गांवरील एसटी बसचे आरक्षण जवळपास ‘हाऊसफुल' झाले आहे. सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने नेहमीप्रमाणे अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन न केल्यामुळे सध्याच्या उपलब्ध वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने जादा आणि तात्पुरत्या बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी सातत्याने करत आहेत. मात्र, महामंडळाकडून अद्यापही या मागणीची योग्य अंमलबजावणी झालेली नाही, ज्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.

( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
 

खासगी बसचालकांकडून थेट दुप्पट भाडेवसुली

एसटीच्या अपुऱ्या सेवेचा आणि प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेत खाजगी बस चालकांनी अक्षरशः दरोडा टाकण्यास सुरुवात केली आहे.

पुणे ते नाशिक: या मार्गावर एसटीचे भाडे सुमारे 350 रुपये ते 400 रुपये आहे, तिथे खासगी बस चालक थेट 700 रुपये ते 800 रुपये इतकी रक्कम प्रवाशांकडून वसूल करत आहेत.
पुणे ते अहिल्यानग: एसटीसाठी या मार्गाचे भाडे 250 रुपये ते 350 रुपये असताना, खासगी ऑपरेटरकडून तब्बल 600 रुपये आकारले जात आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक खाजगी ऑपरेटर्सनी संधी साधून भाड्याचे दर दुप्पट केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, वाहतुकीच्या दरांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही सरकारी यंत्रणा या मनमानी वसुलीकडे लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे.

महामंडळालाही महसूलाचे नुकसान

सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाला महसूलात मोठी वाढ करण्याची संधी असते. मात्र, यंदा वेळेवर नियोजन न केल्यामुळे केवळ प्रवाशांनाच आर्थिक फटका बसत नाहीये, तर एसटी महामंडळालाही उत्पन्नाचे मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने या परिस्थितीची दखल घेऊन, दिवाळीच्या काळात एसटी बसफेऱ्यांची संख्या तातडीने वाढवण्याचे नियोजन करावे, अशी आग्रही मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com