
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. नुकतीच नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या सोडती काढल्या जात आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्याचे आरक्षण काढले गेले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील 13 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहुल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. यात कोणत्या पंचायत समितीमध्ये कोणते आरक्षण पडले आहे याची सोडत काढण्यात आली. त्यानंतर ती सर्वां समोर जाहीर ही करण्यात आली आहे. ही सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तयारीही सुरू केली आहे.
नक्की वाचा - Kadam vs Parab: योगेश कदम यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार? घायवळ प्रकरण भोवणार
पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीमधील आरक्षण सोडत पुढील प्रमाणे आहे. त्यात इंदापूर पंचायत समिती-अनुसूचित जाती, जुन्नर-अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर-नागरिकांचा मागासवर्ग, शिरुर आणि मावळ-नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड- सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव- सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world