Pune Election News: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार आणि भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या शक्तीप्रदर्शनासाठी भाजपची मोठी फळी पुण्यात उतरणार आहे.
भवानी पेठ येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला जाईल.
(नक्की वाचा- BMC Election: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना! भाजपकडून युतीच्या घोषणेआधी या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप?)
महायुतीतील 16 विरुद्ध 25 चा पेच
भाजपने अधिकृत अर्ज भरण्यास सुरुवात केली असली तरी, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खासदार श्रीरंग बारणे आणि स्थानिक नेत्यांनी 25 जागांची मागणी लावून धरली आहे. तर भाजप केवळ 16 जागा देण्यावर ठाम आहे.
भाजपने दिलेल्या 16 जागांपैकी 7 जागा शिवसेनेला नको आहेत. या जागा बदलून देण्यास भाजपने नकार दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः यावर काय तोडगा काढतात किंवा शिवसेना वेगळा मार्ग निवडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(नक्की वाचा- TMC Election: ठाण्यात महाविकास आघाडीचा 'मास्टर प्लॅन'! अनेक चकीत करणारे निर्णय होण्याची शक्यता)
पुण्यात 'तिरंगी' लढतीचे संकेत
पुणे महानगरपालिकेत यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महायुतीत भाजप + शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट + शरद पवार गट, महाविकास आघाडीत काँग्रेस + शिवसेना (UBT) + मनसे असे नवे समीकरण पुण्यात दिसण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात सर्वच प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवार यादी आणि युतीबाबतची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.