
सुमीत पवार, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar News : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील पिंपरी शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रमाबाई विलास जमधडे वय 38, यांनी विहिरीत उडी घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर शनिवारी 12 वाजता अंत्यसंस्कार झाल्यानंतर महिलेचे पती विलास रामभाऊ जमधडे यांनी विहिरी लगतच असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पिककर्जाच्या ओझ्याने दबलेल्या या दाम्पत्याने एका दिवसांच्या अंतराने आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेत दोन चिमुरड्यांचे आयुष्य अंधारात ढकलले गेले आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात असणाऱ्या पिंपरी शिवारातील गट क्रमांक 185 मधील शेतकरी कुटुंबातील रमाबाई विलास जमदाडे (वय ३८) या विवाहित महिलेने शुक्रवारी (27 सप्टेंबर) सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
शेतातील ओझे, आर्थिक विवंचना आणि पिककर्जाचा भार यामुळे त्या सतत तणावाखाली असल्याची चर्चा गावात सुरू होती. शनिवारी अकरा वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी बारा वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत रमाबाई यांचा अंत्यविधी पार पडला. मात्र आजच सायंकाळी सहाच्या सुमारास पती विलास रामभाऊ जमधडे यांनी त्याच विहिरीच्या लगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीच्या मृत्यूचे दुःख, त्यावर वाढलेले पिककर्ज आणि भविष्यातील अंधारलेले आयुष्य या सर्वांनी विलास यांचे मनोबल पूर्णपणे खचले असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे. रमाबाई आणि विलास यांच्या मागे सुमीत आणि अमीत ही दोन मुले आहेत. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या बालकांचे भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले गेले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.
आत्महत्येपूर्वी हृदयद्रावक संदेश
विलास यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ‘सहजयोग ऑनलाईन आळंद' या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक हृदयद्रावक संदेश पाठवला. “माझ्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पिक कर्ज असून मी गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. माझ्या बायकोने देखील काल पिक कर्जामुळे आत्महत्या केली आहे. सुमित आणि अमित मला माफ करा, आणि माझी शेवटची इच्छा म्हणून आळंद येथे राहूनच तुम्ही शिक्षण पूर्ण करा. माझी प्रिय मुले…” असे त्यांनी लिहिले. हा मेसेज वाचून ग्रामस्थांचे डोळे पाणावलेले आहेत.
नक्की वाचा - Palghar News : नवरात्रीचे उपवास अन् मुलांकडून चिकन लॉलीपॉपचा हट्ट; आईने केली मुलाची हत्या, मुलगी गंभीर जखमी
शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकारकडून उपाय योजनांची गरज
या दुहेरी आत्महत्येमुळे आळंद परिसरात शोककळा पसरली असून, पिककर्जाच्या ओझ्याखाली सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वेदना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, विलास जमधडे यांना ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
* पत्नीची विहिरीत उडी, दुसऱ्या दिवशी पतीचा गळफास
* ‘माझी प्रिय मुले मला माफ करा…' – पित्याचा हृदयद्रावक संदेश
* दोन बालकांचे भविष्य प्रश्नचिन्हात; ग्रामस्थ हळहळले
* पिककर्जाच्या सावटाखाली एका कुटुंबाची स्वप्ने उद्ध्वस्त
* पिककर्जाच्या सावटाखाली दोन चिमुरड्यांचे जीवन अंधारात
* पिक कर्जांनी केला संसार उद्ध्वस्त
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world