
प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Nagpur Crime : नागपुरच्या सत्र न्यायालयाने चोरी प्रकरणात दोन महिलांच्या अटकेसंदर्भात मध्यरात्री सुनावणी घेतली. सूर्यास्तानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही, असा नियम आहे. मात्र, नागपूरच्या एका प्रकरणात पोलिसांना दोन महिलांना अटक करायची असल्याने मध्यरात्री अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी सुनावणी घेतली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या दोन महिलांचा चोरीत सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. धर्मनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या सासूला चोरांनी हातपाय बांधून ठेवून घरातील सहा लाख रुपये लुटल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपास केल्यावर, हातपाय बांधून ठेवलेल्या महिलेनेच आपल्या पुर्वीच्या प्रियकरासोबत संगनमत करून हा चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने संपूर्ण गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
नक्की वाचा - Nagpur Crime: ही विकृती थांबणार कधी? पुण्यानंतर नागपुरात घृणास्पद प्रकार; भररस्त्यात तरुणीसमोरच...
या गुन्ह्यात आनंद साहू नावाची व्यक्ती आणि आणखी एक महिला सहभागी असल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. दोन्ही आरोपी महिलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना अटक करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे नागपूरच्या कळमना पोलिसांनी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पंकज देशपांडे यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्याची परवानगी मागितली. मध्यरात्री न्यायाधीश पंकज देशपांडे यांच्या सिव्हिल लाइन्स येथील शासकीय निवासस्थानी या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही महिलांना अटक करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात तिन्ही आरोपींकडून चोरी करण्यात आलेले सहा लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
या प्रकरणात अनैतिक संबंध किंवा इतर कोणते कारण आहे का, याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत. काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या राम झुला परिसरात मर्सिडीज कारने दोन तरुणांना चिरडणाऱ्या रितिका मालू प्रकरणातही न्यायालयाने रात्री सुनावनी घेऊन अटकेचे आदेश दिले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world