रेवती हिंगवे, पुणे: गेल्या काही दिवसांपासून बेंगळोरमधील इंजिनियर तरुण अतुल सुभाष याच्या आत्महत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून अतुल सुभाषने 24 पानी सुसाईड नोट लिहीत आयुष्य संपवल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. असाच धक्कादायक प्रकार आता पुण्यामधून समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पत्नी, सासू आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. प्रफुल्ल हरिश्चंद्र कदम (वय ३५, रा. सत्यम राजयोग सोसायटी, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्याच्या धानोरी परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात पत्नी,सासू आणि मेहुणीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रफुल्लची पत्नी, सासू, मेहुणी (रा. छत्रपती संभाजीनगर) पिंपरी-चिंचवड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर पत्नी, सासू, मेहुणीने प्रफुल्ल यांना ‘तुम्ही आम्हाला फसवले आहे. तू मेला तर मी दुसरा विवाह करून सुखी राहीन', असे म्हणून वारंवार त्रास दिला.
याच त्रासाला कंटाळून तरुणाने 31 डिसेंबर रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रफुल्ल यांनी चिठ्ठीत पत्नी, सासू, मेहुणीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा: धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक? )
दरम्यान, दुसरीकडे तू माझ्या घरी का राहतेस म्हणून जावयाकडून सासूसह मेहुणीला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. सासुला तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणून तिला हाताने मारहाण केली. तेव्हा मध्ये पडलेल्या मेव्हणीवरही चाकूने वार करुन जखमी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय 39, रा. वाघोली - केसनंद रोड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world