जाहिरात

Video : 2 मिनिटभर बापाला थोबाडीत मारलं, आई शेजारी बसून मेंदी काढत राहिली; नागपूरमधील संतापजनक दृश्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या वृद्ध पित्याला मारहाण करताना दिसत आहे.

Video : 2 मिनिटभर बापाला थोबाडीत मारलं, आई शेजारी बसून मेंदी काढत राहिली; नागपूरमधील संतापजनक दृश्य

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

Son beats father Viral Video : आई-बाबा देवासमान असतात. लहानपणी आपल्या पोटाला चिमटा काढून ते मुलांना मोठं करतात. मुलगा खूप मोठा व्हावा, यशस्वी व्हावा स्वत:चं नाव करावं अशी त्यांची आशा असते. यासाठी ते जिवाचं रान करतात. मात्र वृद्धपणी तोच पोटचा गोळा त्यांना मारहाण करीत असेल तर हे दृश्य पाहून कोणच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या वृद्ध पित्याला मारहाण करताना दिसत आहे. साधारण दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मुलगा बापाच्या थोबाडीत मारताना दिसत आहे. वयोवृद्ध पित्याला या वयात आधाराची गरज असताना चक्क मारहाण करतांनाचा व्हिडिओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सायंकाळी घरात सोफ्यावर बसलेल्या वृद्ध वडिलांना समोर उभा असलेला मुलगा मारहाण करत असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. 

आई शेजारी बसून मेंदी काढत असल्याचं दिसतंय. तिच्या समोर मुलगा पित्याला थोबाडीत मारत मारहाण करत आहे. कधी पित्याचे केस धरून, तर कधी कान धरून, तर कधी चक्क जन्मदात्या पित्याची मान धरून मारहाण करीत असल्याचे व्हिडिओवरून दिसून येत आहे.  हा व्हिडिओ कोणी काढला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मुलाला धडा शिकवण्यासाठी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचं सांगितलं जात आहे. 

हा व्हिडिओ नागपूरचा (Nagpur News) असल्याचं समोर आलं आहे. नागपूर पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते ही संतापले. त्यांनी या मुलाचा शोध घेतला. यादरम्यान पोलीस शांतीनगर भागात पोहोचले. मात्र वडिलांनी कुठल्या भीतीपोटी की आणखी काय पोलिसांना तक्रार देण्यास नकार दिला. मला मारहाण झाली नाही म्हणत वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिला. तर आईने हा आमचा घरगुती विषय असून तुम्हाला कोणी बोलावलं असा सवाल केला. 

आता पोलिसांनाही तक्रार दिली गेली नाही. तरी पोलिसांनी मुलाला पोलिसांच्या भाषेत समज दिला. त्यामुळे सोशल मीडियावरून पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या विषयानंतर मुलाकडून पुन्हा वडिलांना मारहाण होणार नाही एवढी अपेक्षा केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आणि कर्मचाऱ्यांना घर शोधण्याच्या सूचना केल्या. मात्र घरी पोहोचून तक्रार न दिल्याने पोलीस म्हणून आम्ही आमचं कर्तव्य केलं आणि मुलाला समज दिल्याचेही त्यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com