जाहिरात
Story ProgressBack

कोणत्या पवारांना मिळणार बारामतीचा कौल? संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेला

Baramati Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये बारामतीचा समावेश आहे.

Read Time: 3 min
कोणत्या पवारांना मिळणार बारामतीचा कौल? संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेला
बारामती लोकसभा निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
बारामती:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये बारामतीचा समावेश आहे. बारामतीवर गेल्या काही दशकांपासून शरद पवार यांच्या घराण्याचा एकछत्री अंमल आहे. राष्ट्रवादी  काँग्रेसमधील फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये बारामतीमध्ये लढत होतीय. गेली 3 टर्म खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंना घरातूनच मोठं आव्हान निर्माण झालंय.  त्यामुळे या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बारामतीचा इतिहास

गेली अनेक वर्षे बारामती लोकसभा मतदार संघावर पवारांचे वर्चस्व प्रस्थापित आहे. 1984 साली शरद पवार पहिल्यादा या मतदारसंघातून निवडून गेले.  1989 ते 91 मध्ये इंदापूरचे शंकरराव पाटील (हर्षवर्धन पाटील यांचे चुलते) निवडून आले. आणि त्यानंतर 1991 साली अजित पवारांना संधी मिळाली पण राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला आणि शरद पवारांनी 2009 पर्यत या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. 2009 साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून आले. 2009 पासून सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. 

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा यामध्ये समावेश होतो.  राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन (अजित पवार, दत्तात्रय भरणे)  काँग्रेसचे दोन (संजय जगताप, संग्राम थोपटे) आणि भाजपचे दोन (राहुल कुल, भीमराव तापकीर) असं सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बलाबल आहे.

( नक्की वाचा : बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार? )
 

सुप्रिया सुळे यांनी 2009 मध्ये भाजपच्या कांता नलावडे यांचा 2014 मध्ये महादेव जानकर यांचा तर 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. 2009 साली 2 लाख 46 हजार मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. 2014 मध्ये हे मताधिक्य 69, 666 पर्यंत खाली आलं. तर 2019 मध्ये 1 लाख 30 हजारांचं मताधिक्य घेत सुप्रिया सुळे यांनी ही जागा राखली. 

भाजपाचा चंग

भारतीय जनता पार्टीनं 2021 सालीच बारामती जिंकण्याच्या दृष्टीनं तयारी सुरु केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर या भाजपा आणि मित्रपक्षातील नेत्यांनी बारामतीचे दौरे केले. गेल्या वर्षी अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि बारामतीचं समीकरण आणखी रंगतदार बनलं.

( नक्की वाचा : ' 7 तारखेनंतर हे लोकं घरी आले तर मिशी कापून देईन,' अजित पवारांनी दिलं बारामतीमध्ये चॅलेंज )
 

राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मोठं आव्हान निर्माण झालंय. दोन्ही गटाकडून या निवडणुकीत जोरदार प्रचार झालाय. घरचे आणि बाहेरचे पवार हा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला. 

बारामती लोकसभा मतदारसंघातून 51 टक्के मतदान घेऊन महायुतीचा उमेदवार जिंकून येईल असं सातत्याने भाजपचे नेते सांगत आहेत.  अजित पवारांनी देखील बारामतीत जिंकणार असल्याचं सांगितल आहे. शरद पवारांना सोडून अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाणं हे बारामतीकरांना रुचले आहे का? अजित पवार सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करू लागलेत हे बारामतीकरांना आवडले आहे का? या सर्व प्रश्नांचं उत्तर चार जून रोजी मिळेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination