भारतात लोकशाहीच्या महापर्वाची सुरुवात झाली आहे. 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आंतरराष्ट्रीय प्रभावही पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या निवडणुकीची चर्चा व्हावी यासाठी भाजपकडून प्लानिंग करण्यात आलं आहे. यासाठी जगभरातील तब्बल 20 ते 25 राजकीय पक्षांना भारतात येऊन लोकशाहीच्या महापर्वात सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. यानिमित्ताने इतर देशातील राजकीय पक्षांना भारतातील निवडणूक कशा प्रकारे आयोजित केली जाते, याचा साक्षीदार होता येणार आहे.
या देशातील राजकीय पक्षांना निमंत्रण...
भाजपने अमेरिका, इंग्लंड, युरोपियन देश, नेपाळसह अन्य देशांतील तब्बल 20 ते 25 राजकीय पक्षांना भारतात येऊन लोकसभा निवडणूक पाहण्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती एबीपी न्यूजकडून देण्यात आली आहे. इंग्लंडचा Conservative and labor Party, जर्मनीची Christian Democratic party, अमेरिकेची Democratic आणि Republican यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांचाही समावेश आहे. भारता शेजारील देश नेपाळच्या सत्ताधाऱ्यातील पाच पक्षांना आमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
भारतातील निवडणुका कशा होतात, हे पाहण्यासाठी परदेशातील अनेक पक्ष इच्छूक आहेत. यासाठी पहिल्यांदाच काही देशातील राजकीय पक्षांना भारतातील निवडणूक पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं भाजपचे परराष्ट्र विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाला यांनी सांगितलं. भाजप कशा प्रकारे प्रचार करते हेदेखील दाखविण्यात येईल. आतापर्यंत 13 राजकीय पक्षांकडून नक्की करण्यात आलं आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचाही समावेश असेल. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या रॅलीत नेण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world