निनाद करमरकर उल्हासनगर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधानामुळे उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे चर्चेत आले होते. त्यांनी आता त्यांच्याच पक्षाच्या विधानसभा अध्यक्षांशी चक्क पहिल्या रांगेतल्या खुर्चीवरून वाद घातला. या वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. रामचंदानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने त्यांचा निषेध केला होता. यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समेट घडवून आणत महायुतीकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा उमेदवार कुमार आयलानी, भाजपा विधानसभा अध्यक्ष जमनू पुरस्वानी पहिल्या रांगेत बसले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रामचंदानी यांच्या विधानावरून नुकताच वाद झाल्यानं पुरस्वानी यांनी त्यांना मागच्या रांगेत बसण्यास सांगितलं. मात्र यावरून रामचंदानी यांनी पुरस्वानी यांच्यासोबत वाद घातला. शिवाय पहिल्या रांगेत बसले. उपस्थित पत्रकारांच्या कॅमेरात ही सगळी घटना कैद झाली. अखेर उमेदवार कुमार आयलानी यांनी या दोघांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. सध्या उल्हासनगरमध्ये यावादाची चर्चा जोरदार होत आहे. भाजप आणि शिवसेनेत समेट घडवण्याची प्रक्रीया सुरू असतानाच भाजपमध्येच वाद झाल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज- महिलांना दरमहा 3 हजार, मोफत बस प्रवास! मविआच्या 5 गॅरंटी कोणत्या?
"आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. ज्यांना आम्ही काल गद्दार म्हणत होतो, ते आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहेत, त्यांना आज आम्ही खुद्दार म्हणतो. काळाने हा बदल केला आहे", असं प्रदीप रामचंदानी हे भाषणात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आक्रमक होत रामचंदानी यांचा निषेध केला होता. तसंच त्यांना पदावरून हटवून निवडणुकीपासून दूर ठेवण्याची मागणी केली होती.
ट्रेंडिंग बातमी -मविआची सभा शरद पवारांनी गाजवली, भाजपला ठोकून काढलं
तर दुसऱ्याच दिवशी आयोजित महायुतीच्या मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी रामचंदानी यांना शिवीगाळ करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसंच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे त्यांची तक्रार करत महायुतीच्या मेळाव्यावरही बहिष्कार घातला होता. आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची समेट वरिष्ठांनी घडवून आणल्यानंतही या सगळ्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली, त्या रामचंदानी यांचा तोरा मात्र कायम असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world