- डोंबिवलीतील भाजप नेते जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर युतीसंबंधी गंभीर आरोप केले आहेत
- जगन्नाथ पाटील यांनी शिवसेनेवर पाठीत खंजीर खुपसण्याची टीका केली आहे
- शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
अमजद खान
युती करायची आणि पाठीत खंजीर खुपासयचा. 2019 आणि 2024 विधानसभा निवडणूकीचा हवाला देत डोंबिवलीचे भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर गंभीर स्वरुपाची टिका केली. शिवाय स्वबळाचा नारा दिला. जगन्नाथ पाटील यांच्या या विधानाला शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. मी अपक्ष उमेदवार होतो. मला एकनाथ शिंदे यांनी मदत केली असती तर आज भाजपचा आमदार नाही, तर त्या जागी मी आमदार झालो असतो असं ते म्हणाले. त्यामुळे अशा वल्गना करु नका, ज्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखविण्याची वेळ येईल. एकीकडे युतीची चर्चा आणि दुसरीकडे भाजप-शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत युतीबाबत चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या विधानामुळे राजकारण चांगले तापले आहे. कल्याण पूर्वेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्या दरम्यान भाजपचे ज्येष्ट नेते पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली. युती करायची आणि पाठीत खंजीर खुपसायचा. 2019 मध्ये कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे हे अपक्ष उभे होते. त्यांना सगळी मदत त्या वेळच्या शिवसेनेने केली. असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
त्यानंतर 2024 मध्ये भाजपच्याच सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेनं महेश गायकवाड यांना बंडखोर म्हणून उभे केले. त्यांना 54 हजार मते कुठून आली असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सगळी मदत केली. इतकी मोठी निवडणूक लढण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती होती की नाही हे मला माहिती नाही. पण ते लढले. 54 हजार मते घेतली. ही मते आली कुटून. चार महिन्यांनी त्यांना परत पक्षात घेतले. युतीत असे चालत नाही. आम्ही कुठे तरी चुकलो असू पण आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही असं ही भाजप नेते पाटील म्हणाले.
आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. अशा पद्धतीने काम करणाऱ्यावर विश्वास ठेवणे मला तरी अडचणीचे वाटते. भाजपने कल्याण पूर्वेत जेवढे प्रभाग आहेत, त्या सगळ्या ठिकाणी आपण उमेदवार उभे केले पाहिजेत. 122 उमेदवार उभे करायचे. ही ताकद उभी राहिली तर कुणाच्या बापाची हिंमत नाही. आपला पराभव करण्याची असे आव्हान पाटील यांनी दिले आहे. या संदर्भात शिवसेना शिंदे गट संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी प्रत्युत्तर देत भाजपवरच टीकेची झोड उठवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही युतीत लढलो. महापालिका निवडणुकही युतीत लढायची आहे. खरी युती बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांची होती असं शिवसेना नेते महेश गायकवाड म्हणाले.
काही लोकांनी विचार बदलेले. आपण प्रामाणिक पणे युतीचे काम करीत आलो. खासदार शिंदे यांच्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत गळाभेट सुरु होती. पुढे ते म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील म्हणतात शिवसेनेनं आपल्या पाठीत खंजीर खुपसले. पण वेळोवेळी आमच्या नेत्यांचा अपमान करणे. नीच दर्जाची वागणूक देणे हे बंद करा असे ही ते म्हणाले. जर विधानसभेला एकनाथ शिंदे यांनी मला उभे केले असते तर मला 1 लाख 10 हजार मते पडली असती. आज ज्या ठिकाणी तुमचा माणूस आहे. त्याठिकाणी मी असतो. युतीत असताना आम्ही कधीच टिका केली नाही. कल्याण पूर्वेत भाजपचा एक नगरसेवक निवडून येणे नाकीनऊ होते. युतीमुळे तो निवडून येत होता. त्यामुळे आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नये. काहीही वल्गना करु नये. स्वबळावर एकदा होऊनच जाऊ द्या. विधानसभा निवडणुकीत एक छोटासा मावळा भारी पडू शकतो. तर सगळे जुंपले तर तुमचा सुपडा साफ होईल असा इशाराच त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world