काँग्रेस आणि तामिळनाडूची (Tamil Nadu) सत्ताधारी पार्टी डीएमकेसाठी (DMK) शनिवार हा मोठा दिवस ठरलेला आहे कारण दोन्ही पक्षांनी आघाडीची घोषणा करत जागा वाटपही जाहिर केलेलं आहे. विशेष म्हणजे डीएमकेनं फक्त काँग्रेसलाच (Congress) जागा दिलेल्या नाहीत तर इतर डाव्या पक्षांनाही(CPIM) जागा सोडल्यात. त्यामुळे 40 लोकसभेच्या जागा असणाऱ्या तामिळनाडूत काँग्रेससह इंडिया(INDIA) आघाडीनं एक पाऊल पुढं टाकल्याचं दिसतं आहे. डीएमकेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यात चेन्नईत चर्चेची बैठक पार पडली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या वतीनं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आहे.
जागा वाटपाचा नेमका निर्णय काय?
तामिळनाडुमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी 9 जागा काँग्रेस लढवणार आहे. तसच पुद्दुचेरीची एकमेव लोकसभा जागाही काँग्रेस लढवेल. विशेष म्हणजे मागच्या वेळेस म्हणजे 2019 लाही काँग्रेसनं 10 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 9 जागांवर विजय मिळवला होता. अभिनेते कमल हसन यांचा एमएनएम पक्षही डीएमके-काँग्रेस आघाडीचा भाग आहे. त्यांना कुठलीही जागा सोडण्यात आलेली नाही. पण पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये तामिळनाडूत राज्यसभेची निवडणूक आहे. त्यात एक जागा कमल हसन यांना सोडली गेली आहे. दोन जागा डीएमकेनं सीपीआयएम आणि व्हीसीकेला सोडल्या आहेत.
जागा वाटपावर कोण काय म्हणालं?
तामिळनाडुतल्या जागा वाटपावर सर्वात महत्वाची प्रतिक्रिया आहे ती अभिनेते कमल हसन यांची. मी निवडणूक लढवणार नाही. डीएमके काँग्रेस आघाडी मी ज्वाईन केली आहे ती फक्त देशहितासाठी, कुठल्याही पदासाठी नाही असं कमल हसन म्हणालेत. तर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, आम्ही तामिळनाडुतल्या 9 आणि पुद्दुचरीतली एक जागा लढवणार आहोत. इतर सर्व जागांवर आम्ही डीएमकेला पाठिंबा देऊ. आम्ही सर्वच्या सर्व म्हणजे 40 जागा जिंकू. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस डीएमकेनं 24 जागा जिंकल्या होत्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world