जाहिरात

तीन साखर सम्राट, एक माजी आमदार; घनसावंगी मतदारसंघात कोण मारणार बाजी?

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे.

तीन साखर सम्राट, एक माजी आमदार; घनसावंगी मतदारसंघात कोण मारणार बाजी?
जालना:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात तीन साखर सम्राटांनी साखर कारखानदारीच्या जोरावर निवडणुकीत उडी घेतली तर शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी आमदारानं बंडखोरीचं हत्यार उपसलंय. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रच लक्ष लागलं आहे. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ऊसाचं राजकारण उफाळून आलं आहे. त्याला मतदारसंघातील साखर सम्राट कारण ठरत आहेत. या निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून 3 साखर कारखानदारांनी दंड थोपटत विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली आहे. यात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, भाजप बंडखोर सतिश घाटगे आणि माजी सनदी अधिकारी हिकमत दादा उढाण अशी 3 साखर सम्राटांची नावं आहेत. मतदारसंघात हजारो हेक्टर ऊसाची लागवड क्षेत्र असल्यानं आपला ऊस कारखान्यावर जावा म्हणून नेत्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढं महत्त्व आलं आहे. त्यातच या तीन साखर कारखानदारांमुळे निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.  

प्रतिभा पवार यांना नो एन्ट्री! टेक्सटाईल पार्कबाहेर अर्धा तास थांबवलं, बारामतीत काय घडलं?

नक्की वाचा - प्रतिभा पवार यांना नो एन्ट्री! टेक्सटाईल पार्कबाहेर अर्धा तास थांबवलं, बारामतीत काय घडलं?

पहिले उमेदवार - 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आणि तीन वेळा मंत्री राहिलेले माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे घनसावंगी मतदारसंघातून सहाव्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 सलग पाच वेळा टोपे विधानसभा निवडणुकीत ते घनसावंगी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. घनसावंगी तालुक्यात टोपे यांचे समर्थ आणि सागर अशी दोन साखर कारखाने आहेत. याच सागर आणि समर्थ कारखान्याच्या जोरावर टोपे यांनी 5 वेळा आमदारकी मिळवली. तर उच्चतंत्र शिक्षण, उद्योग, आरोग्य विभागाचे मंत्री म्हणून ही त्यांनी काम केलं आहे.

दुसरे उमेदवार - 

घनसावंगीच्या ऊस पट्ट्यात सर्वात मोठे आणि दुसऱ्या क्रमांकाचे साखर सम्राट म्हणून अल्प काळात ओळख निर्माण करणारे भाजपचे बंडखोर सतिश  घाटगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी समृद्धी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात वेगळा असा दबदबा निर्माण केला आहे. दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला असताना हा प्रश्न सोडवण्यात समृद्धी कारखान्याच्या माध्यमातून मोठी मदत झाली आहे. अन बघता बघता हजारो ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या संपर्कात आले. गावा-गावात संपर्क वाढला आणि समृद्धीच्या सामजिक फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाणदान रस्त्याचा मार्ग मार्गी लागला.आज घाटगे भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिसरे उमेदवार - 

घनसावंगीच्या निवडणुकीत तिसरे उमेदवार आहेत. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण.  उढाण यांनी ऊस उत्पादकांची मतं मिळवण्यासाठी ब्लू फायर नावाचे उसावर प्रक्रिया करून गुळाची भुकटी करणारे दोन मोठे उद्योग सुरू केलेत. सनदी अधिकारी म्हणून अनुभव असलेल्या उढाण यांनी दोन वेळेस शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक ही लढली. मात्र राजेश टोपे यांनी त्यांचा पराभव केला. ठाकरे गटात असलेल्या हिकमत उठाण यांनी वेळेवर शिंदे गटात जाऊन उमेदवारी मिळवली.

दहा हजार पेक्षा जास्त मतदार असतील तर...आयोगाचा आणखी एक निर्णय

नक्की वाचा - दहा हजार पेक्षा जास्त मतदार असतील तर...आयोगाचा आणखी एक निर्णय

चौथे उमेदवार - 

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार आणि सहसंपर्क प्रमुख शिवाजी चौथे हे जिल्ह्यात शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेपासून जिल्हा राहिले आहे. चौथे यांनी 1995 मध्ये अंबड विधासभेतून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत ही जागा मित्र पक्षाला गेल्याने यांनीही बंडखोरीची तलवार उपसली आहे. ऊसाच्या जोरावर साखर कारखानदार दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप चौथे यांनी केला आहे. या विधानसभा निवडणुकीत 3 साखर सम्राट उतरल्यानं शेतकऱ्यांच्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यांना जाईल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. 

अंबड,घनसावंगी तालुक्यात ऊसाचं हजारो हेक्टर क्षेत्र आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात वारंवार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी यंदा ऊसाचं टिपरूही शिल्लक राहणार नाही, असं आश्वासन कारखानदार सम्राट उमेदवारांकडून शेतकऱ्यांना दिलं जातंय. त्यामुळे तिन्हीही कारखानदारांपैकी कुणाच्या पारड्यात ऊस उत्पादक शेतकरी आपली मतं टाकतात याकडे अवघ्या जिल्ह्यासह लक्ष लागलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com