देवा राखुंडे, बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. प्रतिभा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांना तब्बल अर्धा तास गेटवर थांबवण्यात आले. या धक्कादायक प्रकारानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या बारामती टेक्सटाईल पार्कला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र प्रतिभा पवार यांची गाडी आल्यानंतर गेट बंद करण्यात आले तसेच आतमध्ये कोणालाही प्रवेश न देण्याचा आदेश असल्याचे सांगत त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. आतमधून तसा फोन आल्याचेही सुरक्षा रक्षकाने सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे बारामती टेक्सटाईल पार्कची सुत्रे सध्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे असून त्या विद्यमान चेअरमन आहेत.
नक्की वाचा: 'माझी शेवटची निवडणूक..', मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून निवृत्तीची घोषणा
सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानंतर प्रतिभा पवार यांनीहूी संताप व्यक्त केला. आम्हाला शॉपिंग करायची आहे. आम्ही चोरी करण्यासाठी आलो आलो नाही, खरेदीसाठी आलो आहे. अशा शब्दात त्यांनी सुरक्षा रक्षकाला याबाबत जाब विचारला. जवळपास 25 ते 30 मिनिटे प्रतिभा पवार यांना गेटवर ताटकळत उभे राहावे लागले. या धक्कादायक प्रकारावरुन सु्प्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला आहे. ज्या शरद पवारसाहेबांनी बारामतीत टेक्सटाईल पार्क आणला, त्यांच्याच पत्नीला गेटवर अडविण्यात आले,असे त्या म्हणाल्यात.
दरम्यान, काही वेळानंतर प्रतिभा पवार, रेवती सुळे यांना कंपनीमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तिथल्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच युगेंद्र पवार यांना मतदान करण्याचे आवाहनही केले. याप्रकरणी प्रशासनाकडून महत्वाचा खुलासाही करण्यात आला आहे. ज्या गेटने प्रतिभा पवार आणि रेवती सुळे गेल्या होत्या ते गेट टेक्सटाइल पार्कच्या लोडिंग अनलोडिंग गेट असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.
महत्वाची बातमी: 'जो करेल मला मंत्री, त्याचा होईल मी वाजंत्री' उद्धव ठाकरे असं कोणाला म्हणाले?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world