जाहिरात
This Article is From May 11, 2024

मुंबईत हायव्होल्टेज सभा, मोदी-केजरीवालांच्या सभांनी वातावरण तापणार

मुंबईत हायव्होल्टेज सभा होणार आहेत. विशेष म्हणजे पाचव्या टप्प्याच्या या सांगता सभा असणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून या सभांचे आयोजन केले गेले आहे.

मुंबईत हायव्होल्टेज सभा, मोदी-केजरीवालांच्या सभांनी वातावरण तापणार
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. त्या आधी मुंबईत हायव्होल्टेज सभा होणार आहेत. विशेष म्हणजे पाचव्या टप्प्याच्या या सांगता सभा असणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून या सभांचे आयोजन केले गेले आहे. त्यात शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अरविंद केजरीवाल हे मुंबईत सभा घेतील. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलचं तापणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. मुंबई महाविकस आघाडी आणि महायुतीसाठी महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी आपल्या बड्या नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे 17 मे हा दिवस मुंबईत हायव्होल्टेज सभांचा दिवस असेल. या दिवशी शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकाच व्यासपिठावर असतील. महायुतीचीही सांगता सभा असणार आहे. या सभे निमित्ताने मोदी आणि राज ठाकरेहे पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे यासभेकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. 

हेही वाचा - लोकसभा निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार? भेंडवळचं मोठं भाकीत जाहीर

एकीकडे मोदी आणि राज ठाकरे एकत्रीत सभा घेत असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचीही सभा त्याच दिवशी मुंबईत होणार आहे. या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहाणार आहेत. या सभेला केजरीवा, उद्धव ठाकरे शरद पवार हे नेते संबोधित करतील. अरविंद केजरीवाल यांची नुकतीच तुरूंगातून सुटका झाली आहे. त्यांच्या या सुटकेचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे केजरीवाल यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. जोडीला उद्धव ठाकरे असल्याने ही सभाही जोरदार होणार अशी चिन्हे आहेत. सभेची तयारी सुरू असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 

हेही वाचा - जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने साथ सोडली, पाठिंबा कोणाला दिला?

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 13 जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान 20 मे ला होणार आहे. त्यापैकी सहा जागा या मुंबईतल्या आहेत. शिवाय ठाण्यातल्या चार जागांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे मुंबईत मोदी आणि केजरीवाल यांच्या होणाऱ्या सभा या आघाडी आणि युतीसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. या सभांमधून आरोपांचे जोरदार फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com