राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नागपूरमध्ये अज्ञातांनी हल्ला केला होता. हा हल्ला म्हणजे भाजपाचं कारस्थान असल्याचा आरोप देशमुख आणि विरोधी पक्षांनी केला होता. स्वत: शरद पवार यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेमध्ये राज्याच्या गृृहमंत्र्यांनी याबाबत लक्ष दिले नाही तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा दिला होता. या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे रजनीकांतच्या सिनेमात होतं
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात अनिल देशमुखांवर पलटवार केला आहे. 'हिंदी चित्रपटात सलीम जावेद यांच्या कथा प्रसिद्ध होत्या. अनिल देशमुख यांनी देखील त्याच पद्धतीच्या कथा लिहिण्यास सुरु केल्या आहेत. त्यांनी यापूर्वी पुस्तक काढलं त्याची पोलखोल केली. आता असाच हल्ला ते दाखवत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. त्यामधून सर्व चित्र स्पष्ट झालं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
फडणवीस यांनी या विषयावर बोलताना पुढं सांगितलं की, 'एवढा मोठा दगड मारल्यानंतरही कारची समोरची विंड शील्ड फुटली का नाही... एवढा मोठा दगड बोनट वर पडूनही बोनटचे काहीही नुकसान का झाले नाही... दुसरा दगड मागची काच फोडून कार मध्ये आला आहे आणि तो अनिल देशमुख यांच्या पायाशी पडला... मात्र मागून आलेल्या दगडाने अनिल देशमुख च्या मस्तकावर समोर जखम कशी झाली?
असा दगड फक्त रजनीकांतच्या चित्रपटात फेकता येतो.. आणि तो फिरून लागतो... एवढा मोठा दगड लागून ही फक्त खरचटलेले का आहे? हा सर्व सिनेमा तयार करण्यात आला आहे... आपण किंवा आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत आहे.. याकरता कहाणी रचण्यात आली, भाजपला बदनाम करण्यात आले, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.
हे दुर्दैव आहे की शरद पवार यांनीही या घटनेत इकोसिस्टीम तयार केली.. आणि घटनेला एंपलीफाय केलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं
( नक्की वाचा : Exclusive : अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांना इशारा, Video )
देशमुखांचा भाजपाला इशारा
दरम्यान सोमवारी रात्री दगडफेकीत जखमी झालेल्या अनिल देशमुखांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर बोलताना देशमुख यांनी भाजपाला इशारा दिला. 'मी भाजपाला इतकं सांगतो की, मला दगड मारा किंवा गोळी मारा अनिल देशमुख मरणार नाही. तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही', असं देशमुखांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world