जाहिरात

प्रचारावेळी हृदयविकाराचा झटका, ठाकरेंच्या उमेदवारा बरोबर काय झालं?

प्रचारासाठी आता कमी दिवस मिळणार आहे. त्यामुळे त्यांची धावपळ आणि दगदगही होत आहे. त्याचा फटका मात्र उमेदवारांना बसत आहे.

प्रचारावेळी हृदयविकाराचा झटका, ठाकरेंच्या उमेदवारा बरोबर काय झालं?
जळगाव:

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आता उमेदवार प्रचाराला लागले आहे. मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रचारासाठी आता कमी दिवस मिळणार आहे. त्यामुळे त्यांची धावपळ आणि दगदगही होत आहे. त्याचा फटका मात्र उमेदवारांना बसत आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभा मतदार संघात घडला आहे. इथल्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना प्रचारा दरम्यानच हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. सोनवणे यांना ठाकरे गटाने चोपडा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे ह्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यावेळी ते प्रचारात होते. त्रास होत असल्याचे समजताच त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खाजगी रुग्णालयात प्रभाकर सोनवणे यांच्यावर एन्जोप्लास्टी  करण्यात आली आहे. जळगाव वरून चोपड्याकडे प्रचारासाठी जात असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणू लागला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. सद्यस्थितीत प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती ठीक आहे. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

चोपडा विधानसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या मतदार संघातून शिंदे गटाने  चंद्रकांत सोनवणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने आधी या मतदार संघात राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या नावाला स्थानिक शिवसैनिकांनी जोरदार विरोध दर्शवला. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यांच्या ऐवजी प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाकर सोनवणे हे भाजपचे नेते होते. त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश उमेदवारी मिळवली आहे.

ट्रेंडिंग बातमी - माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद

चोपडा विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेत फुट पडल्यानंतर इथं पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर इथले विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळाली आहे. आता हा गड शिंदे राखणार की ठाकरेंची सेना हा मतदार संघ आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ऐन निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराला हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्याचा किती परिणाम निवडणुकीवर होणार हे पाहावे लागेल.